गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना बंदी प्रकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. याबद्दलची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दादरचा प्रसिद्ध कबुतरखाना ताडपत्री लावून बंद करण्यात आला होता. दादर कबुतरखान्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष रीट पिटीशन सर्वोच्च न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे कबुतरखान्यासंबंधी जो काही निर्णय व्हायचा असेल तो मुंबई उच्च न्यायालयामध्ये होईल, असे नमूद करण्यात आले आहे. आता याबद्दल मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कबुतरखान्याच्या वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
माणसं महत्त्वाची की कबुतरं महत्त्वाचीकोणत्याही जैन मुनींनी शस्त्र उचलण्याची भाषा केलेली नाही. निलेश जैन मुनी नावाचे एक सन्माननीय मुनी आहेत, तेच एकटे असं बोलले आहेत. तसेच सुप्रीम कोर्टाकडेही त्यांनी जी याचिका दाखल केली, ती त्यांनी दाखल करुन घेतलेली नाही. त्यासोबतच माझं असं म्हणणं होतं की यात माणसं महत्त्वाची आहेत की कबुतरं महत्त्वाची आहेत, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शेवटी माणसं जगली तर कबुतरांना खायला घालतील ना, असा खोचक टोला बाळा नांदगावकर यांनी लगावला.
राहता त्याच सोसायटीत बाजूला एखादा कबुतरखाना सुरु करापण जर कबुतरांमुळे आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी असं म्हणालो होतो की मला असं वाटतंय की खरंच जीवदया आणि भूतदया आम्हालाही करावीशी वाटते. आम्हीही करतो. पण याचा अर्थ असा नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण जीवदया भूतदया करत राहायचे. त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीत आपण आपले फ्लॅट घेता, त्या त्या सोसायटीत आपण स्विमिंगपूल, जिम यांसारख्या गोष्टी घेतो. मग त्याच सोसायटीत बाजूला एखादा कबुतरखाना सुरु केला, तर काय बिघडलं. तो करा, म्हणजे जवळच्या जवळ तुम्हाला दाणापाणी देता येईल, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.
आम्ही निर्णयाच्या बाजूनेयात ८० ते ९० टक्के जैन समाज विरोधात आहे. कारण जैन समाजाला कळलं आहे. एका डॉक्टरांनी काय नुकसान होतात ते सांगितलेले आहेत. त्यामुळे माणसांना महत्त्वं देणं, आरोग्याची काळजी घेणं, पर्यावरणाला नुकसान होणार नाही, हे पण करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे, आम्ही त्या निर्णयाच्या बाजूने आहोत, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.