अभिजीत सोनावणे/ बालाजी सुरवसे | धाराशीव/नाशिक
महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आणि निवडणुका जिंकणार असा विश्वासाचा राजकीय मनोरा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रचला. राऊतांच्या वक्तव्यानंतर दहीहंडीच्या उत्सवाआधीच 'राजकीय काला' सुरू झाला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि भाजपच्या नेत्यानं तर टीकेचे थरावर थर रचून राजकीय हंडी फोडून टाकली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यानं एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही, असं शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. तर आता घोडामैदान समोर आहे. उगाच काहीतरी वल्गना करून उपयोग नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले.
Maharashtra Politics: मुंबईत मनसे-शिवसेनेचीच ताकद, कामाला लागा; राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेशमुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक आणि कल्याणमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढतील आणि जिंकतील, असा विश्वास संजय राऊतयांनी व्यक्त केला होता. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी टीकास्त्र सोडलं. मला वाटतं घोडामैदान जवळ आहे. उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही. त्यांना एकत्र यायचंय, एकत्र यावं. लोकशाही आहे. कुणीही एकत्र येऊ शकतात, कुणीही वेगळे होऊ शकतात, अशी टोलेबाजी महाजन यांनी केली.
Maharashtra Politics: शिक्कामोर्तब! ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणारमुंबई, पुणे, नाशिकसारख्या एखाद्या ठिकाणी तरी त्यांनी निवडून येऊन दाखवावं, अशा शब्दांत महाजन यांनी आव्हान दिलं. लोकांचा विश्वास भाजप आणि महायुतीवर आहे. विकास करायचा असेल तर महायुतीच करू शकते. आता महाराष्ट्रात फक्त महायुती अशी लोकांची मानसिकता झालेली आहे. संजय राऊत यांना फार गंभीरतेने घेण्याचा विषय नाही. निवडणुकीला सामोरे जा. निकाल लागल्यावर आपण बघू, असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंना महायुतीत घेण्यावरही महाजन यांनी भाष्य केलं. या ऑपरेशनमध्ये मी नाही. आमचे नेते आहेत. हा विषय खूप मोठा आहे. देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. ते या विषयात लक्ष घालत आहेत. फडणवीस आणि रवींद्र चव्हाण हेच याबाबतीत काही सांगू शकतात, असं सांगून त्यांनी विषय टोलवून लावला.
मराठीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केलं. निवडणुका आल्या की फक्त मराठी-मराठीचा नारा लावायचा. मराठी मतं काही आमची नाहीत का? विधानसभेला आपण पाहिलं विक्रमी मतांनी आम्ही विधानसभेत निवडून आलो. सगळ्या भानगडी लावण्याचे काम त्यांनी वर्षभर केलं, मात्र काहीही उपयोग झाला नाही. आम्ही मतभेद करत नाही. लोकांचा विश्वास हा महायुतीवरच आहे. लोकांना माहिती आहे की आपल्या शहरांचा विकास कोण करणार?कोण निधी देणार? कोणी कितीही वल्गना केल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असं ते म्हणाले.
दुसरीकडं, ठाकरेंच्या युतीवर शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी धाराशीवमध्ये बोलताना थेट प्रतिक्रिया दिली. कोणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही. सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील. मुंबई, ठाणे, पनवेल सगळीकडे महायुतीचे नगरसेवक निवडून येतील. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याने एकनाथ शिंदेंना काहीही फरक पडणार नाही, असं सरनाईक यांनी ठणकावून सांगितलं.