Tehran Movie Review: जॉन अब्राहम आणि देशभक्तीचा फॉर्मुला चालला की नाही? ओटीटीवर 'तेहरान' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू वाचा
esakal August 17, 2025 04:45 AM

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देशभक्तीपर चित्रपट आतापर्यंत अनेक आले आहेत. त्यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आता स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'तेहरान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. इस्रायल, इराण आणि भारतातील राजनैतिक घडामोडींभोवती विणलेली ही कथा आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट आहे आणि एकूणच कथानक पाहता शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा २०१२मध्ये घडणारी आहे. या चित्रपटात डीसीपी राजीव कुमार (जॉन अब्राहम) हा या कथेचा मुख्य नायक आहे.

आपल्या कुटुंबाला धमकावणाऱ्या मकवाना टोळीच्या म्होरक्याला धडा शिकवून राजीव कुमार आपल्या घरी परतत असतो. त्यावेळी दिल्लीतील इराणी दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट होतो. या बॉम्बस्फोटामध्ये रस्त्यावर फुले विकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी अंत होतो. या घटनेचा राजीव कुमारला खूप मोठा धक्का बसतो. सुरुवातीला हा एक दहशतवादी हल्ला असावा, असे सगळ्यांना वाटते. परंतु जेव्हा राजीव कुमार या घटनेच तपास करू लागतो तेव्हा या बॉम्बस्फोटाचे धागेदोर इस्रायल आणि इराण यांच्याशी जोडलेले असल्याचे समोर येते. मग राजीव कुमार या घटनेचा तपास आपल्या हाती घेतो. दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचा विडा तो उचलतो.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

या मिशनवर राजीवसोबत एसआय दिव्या (मानुषी छिल्लर) आणि डिप्लोमॅट शैलजा (नीरू बाजवा) असतात. या घटनेच्या खोल तपासासाठी तो थेट तेहरानपर्यंत पोहोचतो. तेथे त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मग तो आपले मिशन पूर्ण करतो का. त्याला तेहरानमध्ये कोण अडथळे आणतो... त्याच्यावर राजीव कशी मात करतो.. अशा पद्धतीने हळूहळू कथानक पुढे सरकते. या चित्रपटाची कथा भारतातील दिल्ली तसेच अबू धाबी, इराण आणि इस्रायल या देशांमध्ये फिरते.

दिग्दर्शक अरुण गोपालन यांनी ही अत्यंत गुंतागुंतीची कथा सुंदररीत्या गुंफलेली आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना उत्सुकता वाढविणारा झाला आहे. वळणावळणाने जाणाऱ्या या कथेमध्ये अनेक टर्न आणि ट्विस्ट येतात आणि पुढे नेमके काय होणार याबाबत मनात कुतुहूल निर्माण होते. या कथेला एक भावनिकदेखील पैलू आहे. त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला बांधून ठेवणारा झाला आहे. सिनेमॅटोग्राफर येवगेनी गुबरेबको आणि आंद्रे मेनेझेस यांनी तेहरानचे अरुंद रस्ते, गजबजलेल्या बाजारपेठा तसेच अन्य लोकेशन्स आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केले आहेत. केतन सोढा यांच्या पार्श्वसंगीताने कथेला एका वेगळ्या पातळीवर नेले आहे.

या सगळ्याला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची साथ लाभलेली आहे. देशभक्तीपर चित्रपट करण्यात जॉन अब्राहमचा हातखंडा आहे आणि त्याने या चित्रपटात राजीव कुमारच्या भूमिकेत ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राजीव कुमारच्या भूमिकेचे बेअरिंग त्याने छान पकडले आहे. या भूमिकेतील भावभावना त्याने पडद्यावर उत्तम रेखाटल्या आहेत. त्याला उत्तम साथ मानुषी छिल्लर, नीरू बाजवा, मधुरीमा तुली, दिनकर शर्मा आदी कलाकारांनी दिली आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे आणि त्याला चांगली ट्रिटमेंट दिग्दर्शकाने दिली आहे. चित्रपटामध्ये अॅक्शनचा थरार असला तरी रोमान्स आणि विनोदाची कमतरता नक्कीच जाणवते. संगीताची उणीवही जाणवते. २०१२ मधील एका सत्य घटनेवर आधारित असलेली ही कथा नक्कीच खिळवून ठेवणारी आहे. वेगवान कथानकामुळे गुंतवून ठेवणारा भावनाप्रधान असा हा एक थ्रिलर चित्रपट आहे.

तुला कसा नवरा हवाय? रिंकू राजगुरूने दिलेल्या उत्तरावर प्रार्थना बेहेरेने दिला सल्ला; म्हणते- तेव्हाच लग्न कर जेव्हा तू...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.