बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलनादरम्यान बेपत्ता झालेल्या विनोद पवार यांचा मृतदेह तब्बल 40 तासांनंतर शोध आणि बचाव पथकाला सापडला. शनिवारी, 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास, आंदोलन स्थळापासून 14 किलोमीटर अंतरावर धुपेश्वरजवळ पूर्णा नदीच्या गाळात पवार यांचा मृतदेह आढळला.
15 ऑगस्ट रोजी, जिगाव प्रकल्पानजीक आडोळ खुर्द येथे गावकऱ्यांनी पुनर्वसन आणि रस्त्यांच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाविरुद्ध प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले होते. आडोळ खुर्द गावाचा जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समावेश असूनही, गावकऱ्यांना अद्याप जमीन आणि योग्य मोबदल्याचा प्रश्न सुटलेला नाही. या आंदोलनादरम्यान विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेतली, परंतु नदीचा वेगवान प्रवाह आणि दुथडी भरलेले पाणी यामुळे ते वाहून गेले. या घटनेने गावकरी, पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथील शोध आणि बचाव पथक तातडीने आडोळ खुर्द येथे रवाना झाले. शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, परंतु अंधारामुळे ती थांबवावी लागली. शनिवारी सकाळी अकोला आणि नांदुरा येथील पथकांनी पुन्हा शोध सुरू केला. अखेर सामूहिक प्रयत्नांनंतर पवार यांचा मृतदेह सापडला.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. आंदोलकांनी या संपूर्ण प्रकरणाला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, विनोद पवार यांच्या कुटुंबाला अद्याप प्रशासनाकडून कोणतीही तातडीची आर्थिक मदत मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.