कोरेगाव भीमा, ता. १७ : येथील सरपंचाची फॉर्च्यूनर मोटार गुरुवारी (ता. १६) पहाटे त्यांच्या कार्यालयासमोरून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी काही वेळातच केलेल्या या चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील सरपंच संदीप ढेरंगे हे पहाटे पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील त्यांच्या यशराज टॉवरमधील कार्यालयात काम करीत असताना सकाळीच सहाच्या सुमारास त्यांनी खाली येऊन पाहिले असता त्यांची फॉर्च्यूनर मोटार (क्र. एमएच १२ टीएच ९९५५) जागेवर नसल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता ५.४५ वाजण्याच्या सुमारास किया मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी त्यांची फॉर्च्यूनर मोटार काही वेळातच चोरी करून पुण्याच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सीसीटिव्ही फुटेज व मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मोटारीचा वापर करून वर्दळीच्या हमरस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.