छत्तीसगडमधील बिलासपूर येथे लव्ह मॅरेजनंतर अवघ्या 13 दिवसांत एक नवरी गायब झाली आहे. पतीने आरोप केला आहे की, तिच्या सासरच्या मंडळी तिला घेऊन गेले आणि आता तिचा काहीच पत्ता लागत नाहीये. पोलिसांनीही कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी आता हायकोर्टाने मुंगेलीच्या एसपीला 28 ऑगस्टपर्यंत युवतीला शोधून कोर्टात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. नेमकं प्रकरण काय चला जाणून घेऊया…
प्रेमविवाह आणि गायब झालेली नवरी
सूरज बंजारे आणि मुंगेली येथील एक युवती यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं आणि 15 मे 2025 रोजी रायपूर येथील आर्य समाज मंदिरात लव्ह मॅरेज केले. लग्नानंतर दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. मात्र, लग्नाच्या 13 व्या दिवशी, म्हणजेच 28 मे रोजी, युवतीचे कुटुंबीय तिला भेटण्यासाठी आले आणि तिला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की, ती काही दिवसांसाठी माहेरी येत आहे. पण त्यानंतर ती परतलीच नाही आणि तिचा कोणताही ठावठिकाणा लागत नाहीये.
वाचा: भल्याभल्यांना नादाला लावणारी सर्वात श्रीमंत बार गर्ल, क्रिकेटपटूलाही सोडले नाही! एका रात्रीत कमावत होती 90 लाख
पतीची तडफड आणि पोलिसांचा निष्क्रियपणा
सूरजने सांगितलं की, त्याची पत्नी घरी परत येणार होती, पण ती आली नाही. त्याने तिचा शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. युवतीच्या कुटुंबीयांनीही कोणतीच माहिती दिली नाही. सूरजने पोलिसांत तक्रार केली, पण पोलिसांनी त्याला काहीच मदत केली नाही. शेवटी हताश होऊन सूरजने एका महिन्यापूर्वी हायकोर्टात बंदी-प्रत्यक्षीकरण याचिका दाखल केली. याचिकेत त्याने सांगितलं की, युवतीचे कुटुंबीय तिची कोणतीही माहिती देत नाहीत आणि तिला भेटूही देत नाहीत. सूरजला भीती आहे की, त्याच्या पत्नीच्या जीवाला धोका असू शकतो. त्याने म्हटलं, “मला भीती आहे की, त्यांनी माझ्या बायकोला मारलं नसेल ना.”
हायकोर्टात सुनावणी
याचिकाकर्त्याच्या वकिलाने कोर्टात सांगितलं की, युवतीच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिला तातडीने शोधून कोर्टात हजर करावं, जेणेकरून ती सुरक्षित आहे की नाही हे समजू शकेल. हायकोर्टाने या प्रकरणाला गंभीरतेने घेतलं आहे. कोर्टाने मुंगेलीच्या एसपीला सर्वतोपरी प्रयत्न करून युवतीला शोधण्याचे आणि 28 ऑगस्टपर्यंत तिला कोर्टात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, युवतीच्या वडिलांनाही कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.