Exclusive Interview of Aniruddhacharya : मथुरा-वृंदावनचे प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य महाराज हे गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये सतत चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलींच्या लग्नाचं वय आणि त्यांच्या चारित्र्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते. अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या विधानानंतर संपूर्ण देशात ठिकठिकाणी महिला संघटनांनी त्यांचा विरोध दर्शवण्यात आला होता.
आता त्यांनी टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या या विधानांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मुलाखतीत अनिरुद्धाचार्य महाराजांनी या विषयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने अनिरुद्धाचार्य महाराजांना विचारलं की, तुम्ही फक्त मुलींच्या चारित्र्यावर बोट का दाखवत आहात? यावर अनिरुद्धाचार्य यांनी त्यांचा व्हिडिओ प्ले केला आणि ते स्पष्टपणे म्हणाले मी जे विधान केलं ते मुलगा आणि मुलगी दोघांसाठीही होतं.
मुलगा-मुलगी दोघांबद्दल बोललो मी – अनिरुद्धाचार्य महाराज
अनिरुद्धाचार्य यांनी त्यांचा व्हिडीओ प्ले केला, त्यात ते म्हणाले होते – आजकालचे लोक काय करतात तर ते 10 मुलींसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. तर मुली 10 मुलांसोबत लिव्ह इनमध्ये राहतात. जी व्यक्ती 10 लोकांसोबत लिव्ह इनमध्ये राहिली असेल ती कोणत्याही एका व्यक्तीसोबत बंधनात कशी राहील ? अनिरुद्धाचार्य महाराज पुढे म्हणाले मी (ते विधान) मुलगा-मुलगी दोघांसाठी बोललो होतो, पण मीडिया वाल्यांनी फक्त मुलींबद्दलचं विधान दाखवलं.
मुलगी असो किंवा मुलगा, दोघेही चारित्र्यवान असावेत
मुलाखत घेणाऱ्याने अनिरुद्धाचार्य महाराजांना विचारले की तुम्ही म्हणालात की 25 वर्षांची मुलगी 10 ठिकाणी (लिव्ह इन) जावं आणि परत यावं, मग 25 वर्षांचा मुलगाही असेच करतो का? यावर अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘मुलगी असो किंवा मुलगा, दोघांचेही चारित्र्य चांगले असले पाहिजे. लिव्ह-इन रिलेशनशिपसाठी कायदा बनवण्यात आला होता, पण किती लोक लिव्ह-इन रिलेशनशिपला पाठिंबा देतात? जेव्हा लिव्ह-इन रिलेशनशिपसाठी कायदा बनवण्यात आला तेव्हा सामान्य लोकांच्या भावना जाणून घेण्याची गरज नव्हती का? जेव्हा भारतातील लोक लिव्ह-इन रिलेशनशिपला समर्थन देत नाहीत तर भारतात अशा कायद्याची काय गरज आहे?’ असा सवालही त्यांनी विचारला.