आम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय असं नाही… अजित पवार यांचा चंद्रकांतदादांना टोला
Tv9 Marathi August 17, 2025 05:45 AM

इस्लामपूरात महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा.डॉ.एन.डी.पाटील विधी महाविद्यालय आणि इतर उपक्रमाचा उद्घाटन सोहळा झाला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार,भाजपा नेते चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, रोहित पवार यांच्या भाषणाने खसखस पिकली. या भाषणात रोहित पवार यांनी यावेळी या प्रा.डॉ.एन.डी. पाटील महाविद्यालयाला मी ४० लाख देतोय त्यावर चंद्रकांत दादांनी एक शून्य वाढवावे. जयंत पाटील एक शून्य वाढवतील आणि अजितदादा यांच्याकडे वित्त खातं असल्याने ते आणखी दोन शून्य वाढवतील अशा कोपरखळ्या मारल्या. यावर चंद्रकांतदादांनी रोहित पवार यांनी टोमणा मारत आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही असे म्हटले. त्यावर अजित पवार यांनी पवार कुटुंबातील शेंडेफळाची बाजू लावून धरली.

इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ.एन.डी.पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाषण करताना आमदार रोहित पवार यांनी आपण या संस्थेला ४० लाख देतो त्यावर एक शून्य चंद्रकांत दादांनी जोडावे. त्यानंतर जयंत पाटील यांनी एक शून्य जोडावे. आणि राज्याच्या खजिन्याचा मालक येथे बसले आहे. त्यांनी दोन शून्य जोडावे असे आपल्या भाषणात रोहित पवार यांनी म्हटले होते.

भाजपाचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी रोहित पवार यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडून सुरुवात केली. चंद्रकांत दादा म्हणाले की मी अनेक वर्ष मुंबईत होतो. १३ वर्ष संघटनेसाठी काम केलं. राज्यभर फिरलो. त्यानंतर कोल्हापुरात स्थिर झालो. तेव्हापासून एनडी पाटलांशी माझा परिचय झाला. एखादा प्रश्न सुस्पष्ट शब्दात कसा मांडायचा हे एनडी पाटलांकडून शिकले पाहिजे. रोहित यांनी केलेल्या आवाहनबाबत ते म्हणाले की मी एका गिरणी कामगाराचा मुलगा. माझे आई -वडील दोन्ही गिरणी कामगार. तुमच्यासारखा सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलेलो नाही.

माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला १० रुपये. रिटायरमेंटच्यावेळी महिन्याला १४०० रुपये मिळाले. त्यामुळे मी अशी घोषणा करीत नाही असे चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले, ते पुढे म्हणाले की वेळ पडली तर घरदार विकून सामाजिक कार्य करण्याची सवय लागलीय आम्हाला. पण ती वेळ इथे येणार नाही. शासकीय निधी, प्रशासकीय अधिकार हातात आहेत. दादांनी सूचना केली आहे. अर्धा पार्ट माझ्याकडे आहे. त्याची मी घोषणा करतो असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवार यांना दिले.

यावर अजित पवार यांनी आपल्या भाषणात पुतण्या रोहीत पवार यांची बाजू घेतली.अजितदादा म्हणाले की एनडींना आम्ही एनडी मामा म्हणायचो. मला या कार्यक्रमाचं आमंत्रण मला आलं आहे. संगिता आणि प्रशांत आमंत्रण घेऊन आले होते. तसं मी माई आत्यांना माई म्हणत आलोय. त्यामुळे मी सरोज पाटील यांना माईसाहेब वगैरे म्हणणार नाही. मी पाहत होतो.रोहित सारखा माई.. माई करत होता.त्याची आजी आहे.तरी माई माई करतोय.ठिक आहे.बघतो घरी गेल्यावर काय आहे ते असे अजित पवार यावेळी म्हणाले.

रोहितच्यावेळी परिस्थिती बदलली

चंद्रकांत पाटील यांच्याकडे वळून अजित पवार म्हणाले की चंद्रकांतदादा तुम्ही सांगता मी गिरणी कामगाराचा मुलगा, एवढ्या घरात राहायचो. आम्ही देखील तिथे माझ्या माहिती प्रमाणे दोनच खोल्या होत्या. आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीत झोपायचो. विचारा त्याला. म्हणजे आम्हीही फार काही वरणं पडलेलो नाहीये.आम्ही पण काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलोय असं नाहीए. नंतर रोहितच्यावेळी परिस्थिती बदलली ती गोष्ट वेगळी. त्या खोलात जात नाही. पण आम्हीपण अतिशय खडतर परिस्थितीतून आलोय. प्रशांत आम्हाला वरच्या मजल्यावर जायला पायऱ्याही नसायच्या. सांगाडा होता त्यावरून जायचो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.