वरिष्ठ RSS नेते राम माधव यांनी अनेक महत्वाच्या मुद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरने दिलेली अणवस्त्र हल्ल्याच धमकी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वातंत्र्य दिनाच भाषण ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं यावर मोकळेपणाने आपली मतं मांडली आहे. राम माधव यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘कोणी भारताला अणवस्त्र हल्ल्याच्या धमकीने घाबरवू शकत नाही’. ते म्हणाले की, “आपल्याला ट्रम्प यांची शैली समजून घ्यावी लागेल. जसा त्यांनी उत्तर कोरियाशी संवाद साधला होता, त्याच प्रकारे भारत सुद्धा आपलं हित डोळ्यासमोर ठेऊन पुढे जात आहे”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात RSS चा उल्लेख केलेला. त्यावर राम माधव म्हणाले की, “आम्ही सर्व आरएसएस कार्यकर्ते आनंदी झालो. फक्त आम्हीच नाही, तर संघटनेच समर्थन करणारे अन्य लोकही खुश झाले. पण काही लोकांना हे आवडलं नाही” “ऑक्टोंबर महिन्यात RSS आपल्या 100 व्या वर्षाला सुरुवात करणार आहे. मागच्या 100 वर्षात ही संघटना मजबूत झाली आहे” असं राम माधव म्हणाले.
टॅरिफच्या मुद्यावर राम माधव काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावलाय त्यावर राम माधव यांनी प्रतिक्रिया दिली. “ट्रम्प एक ट्रांजेक्शनलिस्ट आहे. ट्रांजेक्शनलिस्ट म्हणजे जो व्यक्ती मोठी आघाडी, समान मुल्यांऐवजी विशेष द्विपक्षीय संबंध आणि करारांवर फोकस करतो” असं राम माधव म्हणाले. राम माधव म्हणाले की, “आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणं हाच केवळ ट्रम्प यांचा उद्देश आहे” “भारत या आव्हानाचा सामना करण्यात अपयशी ठरलेला नाही. भारत अनेक पावलं उचलतोय, प्रत्येक निर्णय राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन घेतला जातोय” असं राम माधव म्हणाले.
‘आरएसएस त्या सर्वांचा विरोध करते’
अनेक वर्षांपासून काँग्रेसने राजकीय कारणांमुळे आरएसएसचा विरोध केलाय असं राम माधव म्हणाले. “काँग्रेस आणि काही अन्य लोक सार्वजनिक मंचावरुन आरएसएसचा विरोध करुन राजकीय लाभ उचलण्याचा प्रयत्न करतात” असं राम माधव म्हणाले. “जे देशाची एकता, अखंडता आणि संप्रभुतेविरोधात आहेत, आरएसएस त्या सर्वांचा विरोध करते” असं राम माधव म्हणाले.