Election Commission Press Conference : गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप केले जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांत मतचोरी होत असल्याचे पुरावेच सादर केले होते. त्यानंतर आता बिहारमध्ये मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीचा (SIR) मुद्दाही चांगलाच तापला आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण 65 लाख मतदारांचे नाव वगळण्यात आले असून विरोधकांनी या प्रक्रियेलाही विरोध केला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले असताना आता निवडणूक आयोगानेही थेट पत्रकार परिषद घेऊन सर्वच प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. निवडणूक आयोगाने मतचोरीच्या आरोपांवरही भाष्य केलंय.
निवडणूक आयोगाची मतचोरीवर काय भूमिका?निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना खोडून काढलं आहे. सात कोटीपेक्षाही अधिक मतदार निवडणूक आयोगासोबत आहेत. निवडणूक आयोग तसेच मतदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. नियमानुसार मतदार याद्यांमधील त्रुटी सांगाव्या लागतात. तसेच मतदारांना मतदान प्रक्रियेवर काही आक्षेप असतील तर निवडणुकीच्या 45 दिवसांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करावी लागते. यापैकी काहीही न करता फक्त मतचोरीचे आरोप केले जात आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावेळी म्हणाले. तसेच मतचोरीसारखे चुकीचे शब्द वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाचा अपमानच आहे, असे प्रत्युत्तरही ज्ञानेश कुमार यांनी विरोधकांना दिले.
बहीण, मुलींचे सीसीटीव्ही सार्वजनिक करणं योग्य आहे का?काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मतदारयाद्या दाखवल्या होत्या. यावेळी काही मतदारांचे नाव, फोटोही सार्वजनिक करण्यात आले होते. यावरही निवडणूक आयोगाने आपली नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने 2019 सालीच मतदारांच्या गोपनियतेबाबत मोठा निर्णय दिला होता. आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं की काही मतदारांचे फोटो त्यांची परवानगी न घेता माध्यमांसमोर ठेवण्यात आले. मतदारांवर आरोप करण्यात आले. आपली आई, बहीण, सून यांच्यासह कोणत्याही मतदाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ निवडणूक आयोगाने सार्वजनिक करण योग्य आहे का? असा सवाल निवडणूक आयोगाने केलाय.
आमच्यासाठी सर्वच पक्ष समान आहेतकायद्यानुसार निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर प्रत्येक पक्षाचा जन्म होतो. त्यामुळे निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव कसा करू शकतो. निवडणूक आयोगासाठी कोणीही सत्ताधारी किंवा कोणीही विरोधी पक्ष नाही. आमच्यासाठी सर्वजण समान आहेत, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले.
निवडणूक आयोग घाबरणार नाहीनिवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे. पण खोट्या आरोपांमुळे निवडणूक आयोग घाबरणार नाही. निवडणूक आयोग भारतातील सर्व मतदारांसोबत आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय.