राज्यात 1970 मधील राजकीय भूकंपाचे हादरे पुढे कित्येकदा जाणवले. एव्हाना या राजकीय भूकंपाने सत्तापालट सुद्धा झाली. पण कायम चर्चा होते ती शरद पवार यांच्या त्यावेळच्या राजकीय बंडाची. वसंतदादा पाटील हे आमचे नेते होते. पण त्यांचे सरकार मीच पाडलं अशी कबुली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. 1978 मधील त्या राजकीय बंडाची चर्चा नेहमी राज्यात होतेच. त्यानंतर राज्यात अनेकदा बंडाळी झाली. पण पवाराचं बंड कायम चर्चेत असतं.
‘पुलोद’चे लोण आजही कायम
1978 साली शरद पवार आणि तत्कालीन सहकाऱ्यांनी पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग राबवला. राजकारणातील ही सर्जिकल स्ट्राईक होती. त्यात वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्यात आलं. त्यामागे शरद पवारांचा मोठा हात असल्याचे समोर आले होते. पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला असा अनेकदा आरोप करण्यात येतो. पण पवारांनी त्यावर अनेकदा उघड भाष्य केलं नव्हतं. पण यावेळी त्यांनी मोठी कबुली दिली. खरं म्हणजे त्यानंतर राज्यात बंडाळ्या थांबल्या नाहीत. पवारांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी आणली आणि आता त्यात अजित पवारांनी बंड केले. शिवसेनेत तीनदा मोठे बंड झाले.
मी मुख्यमंत्री झालो
वसंतदादा हे आमचे नेते होते. पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि तरुणांचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळे आम्ही वसंतदादांचे सरकार घालवले अशी जाहीर कबुली शरद पवारांनी दिली. पण त्यावेळच्या राजकीय प्रगल्भतेवर ही त्यांनी कटाक्ष टाकला. मी जरी वसंतदादांचं सरकार पाडलं असलं तरी, पुढे त्यांनी भूतकाळ विसरत, गांधी-नेहरूंच्या विचारांसाठी मला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला, ही आठवण शरद पवारांनी सांगितली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी शरद पवारांनी 1970 मधील राजकीय घडामोडींची आठवण जागवली.
काय घडली होती घडामोड
वसंतदादा हे इंदिरा काँग्रेसचे नेते होते. ते मुख्यमंत्री होते. तर शरद पवार म्हणाले की आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रभाव होता. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसमध्ये सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू झाली. त्याला शरद पवार आणि इतर तरुण नेत्यांचा मोठा विरोध होता. त्यामुळंच दादांचं सरकार पाडण्याचं ठरवलं आणि ते घालवलं, अशी कबुली त्यांनी दिली.
पुढे 10 वर्षांनी वसंतदादा आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो. त्यावेळी मुख्यमंत्री कुणाला करायचे यावरून खल सुरू झाला. अनेक नावांची चर्चा झाली. पण दादांनी इतर कुणांच्याच नावाची चर्चा न करता मला पाठिंबा दिला. पक्ष सावरायचा आहे, त्यासाठी शरद पवार यांच्याकडं पक्षाचं नेतृत्व सोपवावं असे दादांनी सूचवलं याची आठवण शरद पवारांनी सांगितली. त्याकाळी काँग्रेसमध्ये असं नेतृत्व होतं, हे सांगायला पवार विसरले नाहीत.