Asia Cup 2025 : सूर्यकुमार कॅप्टन, आशिया कपसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ, मोहम्मद कैफकडून या खेळाडूंचा समावेश
Tv9 Marathi August 18, 2025 03:45 AM

बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार सलमान अली आगाह पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांचा पत्ता कट करण्यात आला आहे. आता या स्पर्धेसाठी आणखी 7 संघांची घोषणा होणं बाकी आहे. मात्र आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ कसा असणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिटनेस टेस्ट पास केल्याने सूर्यकुमार यादव या स्पर्धेत खेळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. तसेच भारतीय संघाची येत्या काही दिवसाच घोषणा होणार असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. अशात भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने या स्पर्धेसाठी प्लेइंग ईलेव्हनसह 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कैफने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

कैफने एक्सवर एका व्हीडिओद्वारे त्याच्या 15 सदस्यीय संघातील खेळाडूंची नावं सांगितली आहेत. कैफने या व्हीडिओत आधी प्लेइंग ईलेव्हनमधील 11 खेळाडूंची नावं सांगितली.कैफने त्यानंतर 4 अतिरिक्त खेळाडूंची नावं जाहीर केली. कैफने यशस्वी जैस्वाल आणि रिंकु सिंह या दोघांना डच्चू दिला आहे.

कैफने त्याच्या टीमच्या नेतृ्त्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याला दिली आहे. तर अक्षर पटेल हा कैफचा उपकर्णधार आहे. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी ओपनिंग करेल.

कैफने काय म्हटलं?

“माझ्या संघात संजू आणि अभिषेक दोघेही ओपनर असतील.त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव खेळताना दिसतील. लोअर ऑर्डरमध्ये पाचव्या स्थानी अक्षर पटेल, सहाव्या स्थानी हार्दिक पंड्या आणि सातव्या स्थानी शिवम दुबे खेळेल. तसेच आठव्या-नवव्या स्थानी वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव जबाबदारी पार पाडतील. तसेच अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाज म्हणून असतील”, असं कैफने म्हटलं.

तसेच कैफने प्लेइंग ईलेव्हन व्यतिरिक्त आशिया कप स्पर्धेसाठी संघात 4 खेळाडूंना संधी दिलीय. कैफने शुबमन गिल, जितेश शर्मा (बॅकअप विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद सिराज यांनाही संधी दिलीय.

आशिया कपसाठी मोहम्मद कैफचा भारतीय संघ

What’s your Asia Cup playing 11?
Tell us in the comments! pic.twitter.com/tQXc1TUvC8

— Mohammad Kaif (@MohammadKaif)

आशिया कप 2025 साठी मोहम्मद कैफ याने निवडलेला 15 सदस्यीय भारतीय संघ : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद सिराज.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.