पिंपरी : निगडीत बंद ‘डक्ट’चे झाकण उघडून फायबर केबल दुरुस्तीच्या कामासाठी खाली उतरलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा ‘बीएसएनएल’ व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. त्यामुळे ‘बीएसएनएल’ व ठेकेदारांसाठी कामगारांचा जीव ‘स्वस्त’ झाला आहे का, असा संतप्त सवाल मृतांच्या नातेवाइकांसह कामगार वर्गातून केला जात आहे.
‘बीएसएनएल’ने केबल दुरुस्तीचे काम खासगी ठेकेदाराला दिले होते. ‘बीएसएनएल’ व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मुळातच सुरक्षेसाठी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले नव्हते, तसेच अनेक नियमही धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. परिणामी माणुसकीच्या नात्याने एकमेकांना वाचविताना तीन कंत्राटी कामगारांना अखेरीस आपले प्राण गमवावे लागले.
एकाही कामगाराकडे हेल्मेट अथवा कृत्रिम ऑक्सिजनची उपकरणे नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर रुग्णवाहिका, अग्निशमन पथक अथवा वैद्यकीय यंत्रणा नव्हती. त्यामुळे कंपनी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तीन निष्पाप कामगारांचा बळी गेला असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबत ‘बीएसएनएल’व ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
अशी काळजी अपेक्षित होतीकामगारांची आधी आरोग्य तपासणी करणे
शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासणे
कोणता विकार नाही ना याची खात्री करणे
‘डक्ट’मध्ये उतरण्यापूर्वी प्रशिक्षण देणे
कामगारांच्या कंबरेला दोरखंड बांधून मगच त्यांना खाली सोडणे
दोरी खेचण्यासाठी ‘ट्रायपॉड’ लावणे
दोरी ओढण्यासाठी स्वतंत्र सहकारी सज्ज ठेवणे
अंधारात काम करण्यासाठी ‘हेड टॉर्च’ लावणे
टॉर्चची क्षमता २४ व्होल्टपेक्षा कमी असावी
डक्टजवळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे
स्ट्रेचर आणि प्रथमोपचाराची व्यवस्था करणे
कामगारांची ईएसआय नोंदणी असल्याची खात्री करणे
जमिनीखालील बंद टाक्या किंवा ‘डक्ट’मध्ये गढूळ पाणी साचून वेगवेगळे वायू तयार होतात. त्यामुळे तेथील ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे तेथील ऑक्सिजन आधी तपासावा लागतो. काम करण्यापूर्वी झाकण किमान दीड ते दोन तास उघडे ठेवल्यास विषारी वायूचे प्रमाण कमी होते. खाली उतरणाऱ्या व्यक्तीचे वजन तुलनेने कमी असणे अपेक्षित असते. त्यामुळे श्वसनाचा त्रास होताच त्याला वर काढून त्याचा जीव वाचविणे सुकर होते. सुरक्षेच्यादृष्टीने त्यांना पूर्व प्रशिक्षण देणे गरजेचे असते. अशी कामे करणाऱ्या कामगारांना गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी आमची सदैव सहकार्याची भूमिका आहे.
- विश्वास पाटील, वरिष्ठ व्यवस्थापक, औद्योगिक सुरक्षा विभाग, फौरशिया इंडिया, भोसरी