मरण स्वस्त झालं… दररोज बॉम्बस्फोट अन् आक्रोश, 22 महिन्यांत तब्बल 62000 लोकांचा मृत्यू
Tv9 Marathi August 18, 2025 03:45 AM

गाझा पट्टीत झालेल्या हल्ल्यांच्या बातम्या तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. इस्रायली हल्ल्यांमुळे येथील नागरिकांचे जीवन नरकासारखे बनले आहे. येथे मरण स्वस्त झालं आहे. कारण दररोज येथे अनेकांचा मृत्यू होत आहे. गेल्या 24 तासांत 51 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 369 लोक गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 पासून सुरू येथे संघर्ष सुरु आहे. या संघर्षात आतापर्यंत 61 हजार 827 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1 लाख 55 हजार 275 लोक गंभीर जखमी झाले आहेत. इस्रायलकडून सतत होणाऱ्या बॉम्बहल्ल्यांमुळे आणि गोळीबारामुळे गाझामधील परिस्थिती आता फार बिकट झाली आहे. उंच इमारती आता ढिगाऱ्यात बदलल्या आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने सांगितले की, मे 2025 पासून मानवतावादी मदत मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 1760 लोकांचा मृत्यू झाला आहे.

शाळेवरही हल्ला

सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे गाझातील चित्र हृदयद्रावक बनले आहे. शुक्रवारी सायंकाळी इस्रायलने एका शाळेवर हल्ला केला, या शाळेत अनेक कुंटूंबे आश्रय घेत होती. या हल्ल्यात अनेक महिला आणि मुलांचा मृ्त्यू झाला आहे. हल्ल्यानंतर शाळेच्या परिसरात रडण्याचे आणि किंचाळण्याचा आवाज येत होता.

उपासमारी

गाझामध्ये लोक केवळ बॉम्बहल्ल्याने नव्हे तर उपासमारीने देखील मरत आहेत. जेवण मिळणाऱ्या ठिकाणाच्या बाहेर मुले, महिला आणि वृद्धांच्या लांब रांगा लागलेल्या असतात. लोकांना एक वेळचे जेवणही मिळत नाही. अनेकदा विमानांद्वारे आकाशातून मदत साहित्य टाकले जात आहे, मात्र ही मदत अपुरी पडत आहे.

कुपोषणाने चिमुकल्यांचा मृत्यू

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत उपासमार आणि कुपोषणामुळे 239 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 106 चिमुकल्यांचा समावेश आहे. हल्ल्यांमुळे अनेक लोक बेघर, भुकेलेले आहेत. गाझातून आता मदतीची मागणी केली जात आहे. जगातील अनेक देश मदत करण्यास तयार आहेत, मात्र त्यांना मदत करता येत नाही. आगामी काळात हल्ले थांबले नाहीत तर आणखी बऱ्याच लोकांचा यात मृत्यू होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.