स्थानिक, स्वदेशी रागासाठी गायन
Marathi August 18, 2025 09:25 AM

पंतप्रधान मोदींचे ट्रम्प यांच्या टॅरिफवर अप्रत्यक्ष प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी दिल्लीवासीयांना दोन गिफ्ट प्रदान केले. पंतप्रधानांनी द्वारका एक्स्प्रेसवेच्या दिल्ली सेक्शन आणि अर्बन एक्सटेंशन रोड-2 चे उद्घाटन केले आहे. उद्घाटन कार्यक्रमादरम्यन पंतप्रधानांच्या निशाण्यावर अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राहिले. थेट नाव न घेता पंतप्रधानांनी ट्रम्प यांना संदेश दिला. पंतप्रधानांनी वोकल फॉर लोकलचा पुनरुच्चार करत देशवासीयांना साथ देण्याचे आवाहन केले. लोकांनी भारतात राहून भारतीय उत्पादनेच खरेदी करावीत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांसोबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी उपसिथत होते.

देशाच्या लोकांनी ‘वोकल फॉर लोकल’च्या मंत्रासोबत खादीचा स्वीकार केला. आमचे मेड इन इंडिया युपीआय जगातील सर्वात मोठे रियल-टाइम डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ठरले आहे. लोकांनी आता वोकल फॉर लोकच्या मंत्रावर मला साथ द्यावी. देशाने मेड इन इंडिया फोनवरही विश्वास दाखविला आहे. 11 वर्षांपूर्वी आम्ही आमच्या गरजेचे बहुतांश फोन आयात करत होतो, तर आता बहुतांश भारतीय ‘मेड इन इंडिया’ फोनचा वापर करतात. आम्ही दरवर्षी 30-35 कोटी मोबाइल फोन तयार करतो आणि आम्ही त्यांची निर्यातही करतो असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

सणासुदीच्या काळात स्थानिक उत्पादनेच खरेदी करावीत, जेणेकरून कामगार आणि व्यापारी दोघांनाही लाभ होऊ शकेल आणि पैसे भारतातच राहतील. दिल्ली ही अशी राजधानी ठरू लागली आहे, जी भूतकाळाचा वारसा आणि भविष्याच्या आधुनिकतेचे संगम करविते. दिल्ली आगामी काळात एक उत्तम आणि विकसित राजधानी म्हणून उदयास येईल असा विश्वास असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

ऑगस्टचा महिना स्वातंत्र्य आणि क्रांतिचे प्रतीक आहे आणि अशा काळात राजधानी दिल्ली विकास क्रांतिची साक्षीदार ठरत आहे. नव्या रस्ते प्रकल्पांमुळे दिल्ली, गुरुग्राम आणि पूर्ण एनसीआरमध्ये लोकांचा प्रवास सुलभ ठरणार आहे. आता ऑफिस, कारखाने आणि व्यवसायासाठी ये-जा करणे अधिक सहज असेल. यामुळे वेळेची बचत होईल आणि व्यापारी, उद्योजक आणि शेतकऱ्यांना विशेष लाभ होणार असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे.

मागील 11 वर्षांमध्ये दिल्ली-एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीत अभूतपूर्व सुधार झाला आहे. येथे आता विश्वस्तरीय एक्स्प्रेसवे, विशाल मेट्रोजाळे, नमो भारत सारख्या रॅपिड रेल्वे सेवा आणि आता नवे रस्ते उपलब्ध आहेत. द्वारका एक्स्प्रेसवे आणि अर्बन एक्सटेंशन रोड दिल्लीला वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा देतील. अर्बन एक्सटेंशन रोड निर्माण करण्यासाठी लाखो टन कचऱ्याचा शास्त्राrय वापर करण्यात आला आहे. दिल्लीला कचऱ्याच्या डोंगरांपासून मुक्ती मिळवून देण्याचा  आमचा संकल्प जारी असून या दिशेने हे मोठे पाऊल असल्याचे मोदी म्हणाले.

वाहतूक व्यवस्थापनासाठी गेमचेंजर

द्वारका एक्स्प्रेसवेचा दिल्ली सेक्शन खास आहे, 10.1 किलोमीटर लांब या हिस्स्याला 5,306 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे. रविवारी उद्घाटन झालेले दोन्ही प्रकलप दिल्ली-एनसीआरमध्ये वाहतूक व्यवस्थापनासाठी  गेमचेंजर ठरतील असा सरकारचा दावा आहे. एकीकडे द्वारका एक्स्प्रेसवे प्रवाशांसाठी मोठा पर्याय ठरेल, तर युईआर-2 गर्दीयुक्त भागांमधून वाहतूक कोंडीचा दबाव कमी करणार आहे. याचबरोबर आर्थिक घडामोडींना नवा वेग मिळणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.