- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आपल्यापैकी अनेकांना रक्ततपासणीत वारंवार एकच गोष्ट ऐकायला मिळते, ‘व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ कमतरता आहे’. मग ते लवकर वाढण्यासाठी इंजेक्शन्स घेतली जातात, थोडं प्रमाण वाढतं आणि पुन्हा काही महिन्यांत रिपोर्ट्स ‘लो’ दाखवू लागतात. पण प्रश्न असा आहे, नक्की किती पातळी असावी या व्हिटॅमिन्सची? आणि हे कायम कमीच का राहतंय?
जीवनशैलीचे घटक
व्हिटॅमिन डी : सूर्यप्रकाश हा नैसर्गिक स्रोत; पण आपण दिवसभर घर/ऑफिसमध्ये राहतो, सनस्क्रीन वापरतो, त्यामुळे त्वचेतून व्हिटॅमिन डी तयारच होत नाही. शिवाय, विटामिन डीचं पूर्ण शोषण होण्यासाठी स्निग्ध पदार्थ खाणं गरजेचं असतं (तूप, बटर, लोणी ई). कारण व्हिटामिन डी हे फॅट-सोल्युबल विटामिन आहे.
व्हिटॅमिन बी १२ : प्युअर व्हेजेटेरियन/व्हेगन आहार घेणाऱ्यांमध्ये बी १२ कमी होण्याची शक्यता जास्त असते-कारण बी १२ चा स्रोत फक्त प्राणिजन्य पदार्थ आहेत. बी १२चा वनस्पतीजन्य स्रोतच नाही.
शोषणाची समस्या
तुम्ही बी १२ व्यवस्थित घेतलंही, ते सप्लिमेंट असेल किंवा अन्नातून, पण त्याच्या शोषणासाठी पचनसंस्था व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. गॅस्ट्रिक आम्ल (stomach acid) कमी असल्यास किंवा अँटॅसिड औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास बी १२ नीट शोषलं जात नाही. त्याचप्रमाणे, इरिटेबल बाऊल (IBS), IBD अशा स्थितींमध्ये पण व्हिटॅमिन शोषण कमी होतं.
दाह (Inflammation) आणि पचनसंस्था
जास्त प्रमाणात जंक फूड, साखर, अल्कोहोल, किंवा वारंवार होणारे इन्फेक्शन यामुळे gut lining कमजोर होते. त्यामुळे ‘लीकी गट’ निर्माण होऊन अनेक पोषकद्रव्यांचं शोषण अडतं. म्हणून, या सर्व सूक्ष्मपोषकद्रव्यांचं शोषण नीट होण्यासाठी आतड्यांशी स्थिती (Gut Health) चांगली ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे.
जीन्स आणि मेटाबॉलिझम
शरीरात या व्हिटॅमिन्सना काम करण्यासाठी सक्रिय स्वरूपात बदलायचं असतं. काही लोकांमध्ये MTHFR जीनचे व्हेरिएंट्स असल्यामुळे ते सक्रिय स्वरूपात बदल होत नाही आणि बी १२ आणि फोलेटचा वापर नीट होत नाही. म्हणजेच रक्तात स्तर ठीक दिसला तरी पेशींमध्ये त्याचा वापर व्यवस्थित होत नाही.
सततचा ताण आणि झोपेचा अभाव
ताणामुळे cortisol वाढतो आणि याचा पचन व हार्मोन्सवर थेट परिणाम होतो. परिणामी पोषण तुटी टिकून राहते.
उपाय काय?
पचनसंस्थेची तपासणी आणि उपचार (gut healing)
संतुलित, प्रोटीनयुक्त आहार (अंडी, पनीर, चिकन, मटण, मासे ई आहारात गरजेचे)
सूर्यप्रकाश व हालचाल
ताण नियंत्रण, पुरेशी झोप
‘सक्रिय’ स्वरूपातील सप्लिमेंट्स
(जसे methylcobalamin, sublingual B12)
व्हिटॅमिन डी ३ आणि बी १२ याचा स्तर वाढवण्यासाठी आहार व सप्लिमेंट्स याचं कॉम्बिनेशन लागतंच. व्हिटॅमिन डी हे रक्तात ५०-९० या रेंजमध्ये असणं गरजेचं आहे, आणि बी १२ हे >६०० च्या वर असणं गरजेचं आहे. ही ऑप्टीमल रेंज असते. व्हिटामिन डी ३ सोबत व्हिटामिन के२ हे कॉम्बिनेशन अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून धमनींमध्ये कॅल्शियमचा साठा होत नाही.
निष्कर्ष
व्हिटॅमिन डी आणि बी १२ ही केवळ ‘कमी झालं की भरून काढायचं’ अशी पोषकतत्त्वं नाहीत. त्या आपल्या हाडांच्या, मेंदूच्या, हॉर्मोन्सच्या आणि प्रतिकारशक्तीच्या आरोग्याच्या किल्ल्या आहेत. मूळ कारण शोधून त्यावर काम केलं, आहार बदलला तरच ही कमतरता कायमची दुरुस्त होऊ शकते.