पारनेर - पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा नेवासे, शेवगांव, गेवराईमार्गे श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारकडून स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
खासदार लंके यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन या बाबतचे निवेदन दिले. निवेदनात प्रकल्पाचे सामाजिक, भौगोलिक महत्व स्पष्ट करत या रेल्वे मार्गचा पुन्हा विचार करावा अशी मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे मंत्रालयाच्या २६ सप्टेंबर २०२२ च्या पत्रानुसार, श्रीरामपूर-परळी या २४१ किलोमीटर ब्रॉडगेज प्रकल्पाचा आर्थिक परतावा दर उणे २.५५ टक्के असल्यामुळे प्रकल्प तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
मात्र त्यास आक्षेप घेत केवळ आर्थिक परतावा दर नव्हे तर सामाजिक आणि प्रादेशिक समतोल या बाबींनाही प्राधान्य देण्याची गरज असल्याचे खासदार लंके यांनी निवेदनात म्हटले आहे.
हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. अहिल्यानगर, औरंगाबाद व बीडसारख्या मागास जिल्ह्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा हा रेल्वेमार्ग महत्वाचा आहे. पुणे मुंबई, औरंगाबाद या शहरांमध्ये शिक्षण, रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांना स्वस्त, सुरक्षित आणि जलद प्रवास सुविधा उपलब्ध होईल.
कृषिप्रधान भागातील शेतकऱ्यांना मोठया बाजारपेठा सहज उपलब्ध होऊन वाहतूक खर्चात बचत होईल. वाढत्या अवजड वाहनांच्या पार्श्वभुमीवर रेल्वे ही एक उत्तम पर्यायी वाहतून व्यवस्था ठरू शकते असेही म्हटले आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय एकात्मता व ग्रामीण विकास या धोरणांतर्गत मंजुरी देण्याची आग्रही मागणी खासदार लंके यांनी यावेळी केली.
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर-परळी प्रकल्पांपेक्षा अधिक नकारात्मकता असूनही अहमदनगर-बीड-परळी उणे ५.०४, बारामती लोणंद उणे ३.२२ व सोलापूर-तुळजापूर-धाराशिव उणे ४.३५ या प्रकल्पांना मंजुरी तर श्रीरामपूर-परळी प्रकल्पाची नकारात्मकता फक्त उणे २.५५ असूनही त्यास स्थगिती देणे अन्यायकारक आहे.
- नीलेश लंके, खासदार.