मोखाडा, ता. १८ (बातमीदार) : जो समाज आपला इतिहास विसरतो, तो कालांतराने नष्ट होतो. त्यामुळे फाळणीच्या भयानक वेदनांमधून आपण राष्ट्राची एकता आणि अखंडता टिकवण्याची जबाबदारी समजून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. साहेबराव धनवटे यांनी केले. ते मोखाड्यातील तिलका मांझी आयटीआयमध्ये विभाजन विभीषिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. शशिराज बाविस्कर होते. या वेळी प्रकाश मार्के, कार्यालयाचे प्रमुख संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. धनवटे म्हणाले, १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला, परंतु त्याचवेळी देशाचे दोन तुकडे झाले. मुस्लिमबहुल पाकिस्तान वेगळा झाला आणि धर्मनिरपेक्ष भारत राहिला. या विभाजनावेळी सुमारे १० लाख निरपराध लोकांचा बळी गेला, तर दीड कोटी नागरिकांना स्थलांतर करावे लागले. तब्बल ५५ लाख हिंदू व शीख महिलांचे अपहरण झाले. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. लाखो नागरिकांना छावण्यांमध्ये राहण्याची वेळ आली. ही महाभयंकर त्रासदी विसरता कामा नये.
धनवटे पुढे म्हणाले, आज देशाने एकसंध राहण्यासाठी फुटीरतावादी प्रवृत्ती दूर ठेवायला हव्यात. राष्ट्राची एकता आणि अखंडता ही सर्व नागरिकांची पहिली बांधिलकी असावी. धार्मिक आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान आजही प्रगती करू शकला नाही आणि भारताशी अनावश्यक शत्रुत्व ठेवतो. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून राष्ट्रहित जपले पाहिजे. कार्यक्रमासाठी भाविका तुंबडे, अझहर शेख, माणिक घोडके, भालचंद्र राऊत, हेमंत भोये, कमलाकर थाळेकर यांनी परिश्रम घेतले.