मुंबईत पहाटेपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाने सध्या जोरदार थैमान घातले आहे. मुंबईत सातत्याने सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर दुसरीकडे मुंबई लोकल ठप्प झाली आहे. मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये ३०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. मुंबईत पुढील १२ ते १४ तास असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रेल्वे वाहतूक ठप्पमुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे सेवा या पावसामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईच्या हार्बर आणि मध्य रेल्वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक लोकल गाड्या या थांबलेल्या पाहायला मिळत आहेत. मुंबईतील कुर्ला आणि चुनाभट्टीदरम्यानची लोकल वाहतूक सकाळी ११:२० पासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच वडाळा आणि शिवडीजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे गाड्या अर्धा तासापेक्षा जास्त उशिराने धावत आहेत. त्यातच आता डॉकयार्ड स्टेशनजवळ थांबलेल्या ट्रेनमधून प्रवासी खाली उतरून रुळांवरून चालत प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच मुंबईच्या मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि सायनदरम्यानच्या अप-फास्ट आणि डाउन-फास्ट लोकल सकाळी ११.२५ पासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११.४५ पासून स्लो लोकल सेवाही स्थगित करण्यात आली आहे. सध्या अनेक अधिकारी रुळांवरील पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
मिठी नदी धोक्याच्या पातळीच्या वरमुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळी ओलांडून ३.९० मीटरवर पोहोचली आहे. या पातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने (BMC) तात्काळ कारवाई करत कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरसारख्या भागातील सुमारे ४०० रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी, जवळच्या शाळेत स्थलांतरित केले आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम काम करत आहे.
प्रशासन आणि पोलिसांचा बंदोबस्तमुंबईत शहरभर पाणी साचल्याने वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहतूक दुसरीकडे वळवली आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष २४ तास सज्ज आहे. एनडीआरएफच्या ५ तुकड्या आणि पोलिसांची टीम मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात आहे. नागरिकांना कुठल्याही मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरमयान मुंबईत सुरू असलेल्या या मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता असल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.