Solapur Fraud : 'कुर्डुवाडीतील एकाची ११ लाखांची फसवणूक'; ज्यादा पैशाचा हव्यास नडला, पाेलिस ठाण्यात गुन्हा
esakal August 20, 2025 10:45 PM

कुर्डुवाडी: ऑनलाइन बनावट, ॲप तयार करून शेअर मार्केटमधून शेअर्स व आयपीओ खरेदी करून देतो असे भासवून कुर्डुवाडीतील एकाची १० लाख ९२ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. कमरगणी मुनीर तांबोळी (वय ४४, रा. नालसाबनगर, कुर्डुवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इशिता चौधरी, राजेश शर्मा, अजयसिंह व कंपनीविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादीला सोशल मीडियावर एका कंपनीच्या नावे शेअर मार्केटबाबत माहिती दिसली, त्यावर एक ग्रुप जॉईन करण्याबाबत सांगितल्यावर तो ग्रुप जॉईन केला. ग्रुपचे ॲडमिनवरील तिघे होते. ग्रुपवर दररोज शेअर मार्केट व आयपीओ संदर्भात माहिती दिली जात असे व अधिक परतावा पाहिजे असल्यास कंपनीच्या अॅपमध्ये नोंदणी करून पैसे गुंतवण्यास सांगितले. फिर्यादीने मोबाईलवर ॲप डाऊनलोड करून नोंदणी केली. अधिक परताव्यासाठी खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले.

त्यानुसार फिर्यादीने ९ ऑगस्ट २०२४ रोजी एकूण १० लाख ९२ हजार ५०० रुपये संबंधित कंपनीला आयपीओ शेअर्स घेण्यासाठी पाठवले. ॲपमध्ये २ कोटी ३५ लाख वाढल्याचे दिसत होते. फिर्यादीने २१ ऑगस्टला पैसेकाढण्याचा प्रयत्न केला असता, कंपनीची सर्व्हिस फी म्हणून ५७ लाख ४२ हजार ४३२ रुपये वेगळे भरण्यास सांगण्यात आले. फिर्यादीने पैसे भरण्यास नकार दिला व ऑफिस पत्त्याबाबत विचारणा केली असता, कोलकता येथील पत्ता व फोन नंबर देण्यात आला. फिर्यादीने त्या नंबरवर संपर्क केला पण प्रतिसाद मिळाला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.