टीम इंडियाचा माजी फलंदाज आणि सचिन तेंडुलकर याचा लहानपणीचा मित्र विनोद कांबळी गेल्या अनेक महिन्यांपासून तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत आहे. कांबळी क्रिकेट कारकीर्द ऐन बहरात असताना चुकीच्या मार्गावर गेला. त्यामुळे कांबळी काहीच वर्षांत क्रिकेटपासून दूर झाला. तसेच वाईट सवयींमुळे कांबळीच्या शरीरावरही परिणाम झाला. त्यामुळे कांबळीला गेल्या काही महिन्यांपासून तब्येतीशी झगडावं लागत आहे.
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि असंख्य दिग्गज क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक सर रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं 3 डिसेंबर 2024 रोजी उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि अनेक माजी क्रिकेटपटूंची उपस्थिती होती. मात्र कांबळीची स्थिती पाहवणारी नव्हती. या कार्यक्रमामुळे कांबळीच्या प्रकृतीची अनेकांना माहिती झाली. कांबळीची आर्थिक स्थितीही हलाखीची होती. त्यामुळे आजी-माजी भारतीय क्रिकेटपटू एकवटले आणि कांबळीला मदतीचा हात दिला. त्यानंतर कांबळीवर उपचार करण्यात आले. त्यानंतर अनेक महिन्यांनी आता पुन्हा एकदा कांबळीच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कांबलीचा लहान भाऊ वीरेंद्र याने ही अपडेट दिली आहे.
विनोद कांबळी आताही पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला बोलताना त्रास होत आहे, अशी माहिती वीरेंद्रने दिली. कांबळी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तब्येत बिघडल्याने चर्चेत आला होता. कांबळीला यूरीन इन्फेक्शन झालं होतं. मात्र डिसेंबरमध्ये पुन्हा त्रास वाढल्याने कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्याचं निदान झालं होतं. त्यानंतर कांबळीवर आवश्यक उपचार करण्यात आले. तसेच काही दिवसांनी कांबळीला डिस्चार्ज देण्यात आला होता.
तब्येत आधीपेक्षा चांगली आहे. मात्र बरं होण्यासाठी आणखी वेळ लागेल. कांबळीला बोलताना त्रास होतोय. वीरेंद्रने विनोद लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी, असं आवाहनही केलंय.
“विनोद अजूनही घरीच आहे. हळहळु तब्येतीत सुधार होत आहे. मात्र उपचार सुरु आहेत.त्याला बोलताना त्रास होत आहे. सर्वकाही व्यवस्थित होण्यासाठी वेळ लागेल. मात्र तो चॅम्पियन आहे, तो आजारावर मात करेल. तो पुन्हा चालू, फिरू आणि धावू शकेल. कदाचित तो मैदानातही दिसेल”, असा विश्वास वीरेंद्र कांबळीने व्यक्त केला. वीरेंद्रने विकी ललवानी शोमध्ये विनोदबाबत ही माहिती दिली.
“विनोदने 10 दिवस रिहॅबही केलं. विनोदचं बॉडी चेकअप करण्यात आलं. रिपोर्टमध्ये चिंताजनक असं काही नाही. मात्र चालताना त्रास होत असल्याने डॉक्टरांनी फिजिओथेरेपीचा सल्ला दिला आहे. आताही बोलताना त्याची जीभ अडखळते. मात्र तो हळुहळु बरा होतोय. चाहत्यांनी प्रार्थना करावी. त्याला सर्वांच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे”, असंही वीरेंद्रने म्हटलं.