यजमान ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर उभयसंघातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 19 ऑगस्टला खेळवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात धमाका केला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्याच सामन्यात कांगारुंचा 98 धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आणि गोलंदाज अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाला या पराभवानंतर आणखी एक झटका लागला. आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या एका गोलंदाजाविरुद्ध कारवाई केली आहे.
आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर एडम झॅम्पा याच्यावर आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, झॅम्पाने आयसीसी आचार संहितेच्या अनुच्छेद 2.3 चं उल्लंघन केलं आहे. या अनुच्छेदात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपशब्द वापरल्यास कारवाईची तरतूद आहे. झॅम्पाने नियमांचं उल्लंघन केल्याने त्याला 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 37 व्या ओव्हरदरम्यान मिसफिल्डिंग झाल्याने एडम झॅम्पा वैतागला. झॅम्पाची मिसफिल्डिंगमुळे चिडचिड झाली. त्यामुळे वैतागलेल्या झॅम्पाने नको त्या शब्दांचा वापर केला. झॅम्पा जे काही बोलला ते स्टंप माईकमध्ये रकॉर्ड झालं. मात्र झॅम्पाने त्याची चूक कबूल केली. त्यामुळे कोणत्याही अधिकृत कारवाई करण्याची गरज पडली नाही.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 296 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मारक्रम याने सर्वाधिक 82 धावा केल्या. तर रायन रिकेल्टेन याने 33 धावा केल्या. कॅप्टन टेम्बा बावुमा याने 65 धावा केल्या. तर मॅथ्यू ब्रीट्जके याने 57 धावा जोडल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी ट्रेव्हीस हेड याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या.
ऑस्ट्रेलियाला 297 धावांच्या प्रत्युत्तरात पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 40.5 ओव्हरमध्ये 198 धावावंर गुंडाळलं आणि विजयी सलामी दिली. दरम्यान उभयसंघातील दुसरा सामना हा 22 ऑगस्टला होणार आहे.