नाशिक: आगामी कुंभमेळ्याचे नियोजन करताना राज्यात महायुतीत सत्तेत भागीदार असलेल्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असून शिवसेनेकडे महत्त्वाचे नगरविकास खाते असले तरी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण नियुक्त करून परस्पर कामे केली जात असल्याची बाब शिवसेनेला खटकत असल्याने त्यातूनच सलग तिसऱ्यांदा नगरविकास विभागाकडून कुंभमेळ्याच्या कामांची माहिती मागविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नगरविकास खात्याची कक्ष अधिकारी मो. क. बागवान यांनी विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पत्र लिहून कुंभमेळा नियोजनाची माहिती मागविली आहे.
२०२६-२७ मध्ये नाशिक आणि त्रंबकेश्वरमध्ये कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी महापालिका हद्दीत महापालिका व त्र्यंबक नगरपरिषद व ग्रामीण भागात शासन अशा तीन यंत्रणा आहेत. तिन्ही यंत्रणांकडून शासनाला एकत्रित जवळपास २४ हजार कोटींचा आराखडा सादर केला आहे. नाशिक महापालिका व त्रंबकेश्वर नगरपरिषद नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. परंतु, कुंभमेळ्याच्या कामांचे श्रेय व शासनाकडून कुंभमेळा विकास कामांसाठी दिला जाणारा निधीवर वर्चस्व ठेवण्यासाठी महायुतीमध्ये स्पर्धा होत असल्याचे दिसून येत आहे. नगरविकास विभागाला कुंभमेळ्यापासून दूर ठेवण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण नियुक्त करण्यात आले आहे.
या प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास कामांचे नियोजन केले जात आहे. याचाच अर्थ प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर नगरविकास विभागाचा फारसा संबंध नाही. परिणामी कुंभमेळ्यावर अप्रत्यक्षपणे भाजपचेच प्रभुत्व राहणार असल्याने त्यावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरु झाल्याचे दिसून येत आहे.
Nashik Kumbh Mela : गिरीश महाजनांनंतर आता छगन भुजबळांनीही बोलावली कुंभमेळ्याची बैठक: संघर्ष वाढणार?नगरविकास विभागाने मागविली माहिती
नाशिक व त्रंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यानिमित्त सुरु असलेल्या कामांची यादी नगरविकास विभागाने ५ व २२ मे रोजी मागविली होती. यासंदर्भात काही कागदपत्रांचा उल्लेख देखील केला होता. परंतु, माहिती न मिळाल्याने पुन्हा कक्ष अधिकारी बागवान यांनी १८ ऑगस्ट रोजी पत्र पाठवून नाशिक-त्रंबकेश्वर कुंभमेळ्याच्या अनुषंगाने कामांची यादी व आर्थिक तरतुदी संदर्भात अहवाल सादर करण्याचे पत्र दिले आहे.