एक राज्य 13,552 लोकांचं अपहरण, 9789 महिला गायब, धरणीने गिळल्या की आकाशात हरवल्या? सगळेच हादरले
Tv9 Marathi August 21, 2025 06:45 AM

देशात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी खून मारामारीच्या घटना घडताना दिसत आहेत. तसेच काही ठिकाणी अपहरणाच्याही घटना घडत असल्याचे समोर आले आहे. अशातच आता कर्नाटकातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या राज्यातील अपहरण झालेल्या लोकांचा आकडा अनेकांसाठी धक्कादायक आहे. या आकडेवारीमुळे सरकारचीही चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाच वर्षांमध्ये 13552 लोकांचे अपहरण

कर्नाटक राज्यात अपहरणांच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या 5 वर्षात म्हणजेच 2020 पासून आतापर्यंत राज्यात 13,552 लोकांचे अपहरण झाले असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात 9789 महिला आहेत. तसेच 2025 च्या पहिल्या सात महिन्यांत राज्यात 1318 लोकांचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. यातीस सर्वाधिक 589 लोक राजधानी बेंगळुरूमधून गायब झाले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तर देताना याबाबत माहिती दिली आहे, त्यामुळे हा आकडा समोर आला आहे.

बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या

काही दिवसांपूर्वी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये 13 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाले होते आणि नंतर त्याची हत्या झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. तसेच तुमकुरु, मांड्या, चित्रदुर्ग आणि दावणगेरे जिल्ह्यांमध्येही अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील अपहरणांच्या घटना का वाढत आहेत? यामागे काय कारण आहे? असे प्रश्न नागरिक विचारत आहे. या घटना वाढल्यामुळे सरकारचीही चिंता वाढली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान असूनही अपहरणाच्या घटना वाढल्या

कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपचे विधान परिषदेचे सदस्य सी.टी. रवी यांनी लहान मुलांच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘सध्या सीसीटीव्हीसारखे आधुनिक तंत्रज्ञान असूनही अपहरणाच्या घटना वाढत आहेत. याबाबत उपाय शोधण्यासाठी सरकारने जिल्हा आणि तालुका पातळीवर बैठका आयोजित करायला हव्यात असंही रवी यांनी म्हटलं आहे. आता सरकार अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.