भिवंडीमध्ये पुराचे पाणी ओसरले
esakal August 21, 2025 02:45 PM

भिवंडीमध्ये पुराचे पाणी ओसरले
दुर्गंधीने नागरिक त्रस्त

भिवंडी, ता. २० (वार्ताहर) : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले होते. सोमवारी (ता. १८) १४७ मिमी आणि मंगळवारी (ता. १९) २३१ मिमी अशा एकूण ३७८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे शहरातील काकूबाई चाळ, हंडी कंपाउंड, समरुबाग, कारवली रोड, अजमीनगर, अमानिशा तकिया झोपडपट्टी, इदगाह झोपडपट्टी तसेच म्हाडा कॉलनी, संगम पाडा, अंबिकानगर, ठाणगे आळी, भावे कंपाउंड या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर काढून तात्पुरत्या निवाऱ्याची शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती; परंतु काही नागरिकांनी तेथे जाण्यास नकार दिल्यामुळे त्यांना घरातच अडकून राहावे लागले. पालिकेने तातडीने अन्न व पाण्याचे पॅकेट्स वाटप केले. मंगळवारी १,९५० अन्नपाकिटे व पाण्याच्या बाटल्या वितरित केल्या गेल्या, तर बुधवारीही काही भागांत पाणी शिल्लक असल्यामुळे २,२०० अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले.

पावसाचे पाणी ओसरल्यानंतर आता रस्त्यांवर घाण, कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे. पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्याचे काम सुरू असून, जेथे अजूनही पाणी साचले आहे तिथे निचरा झाल्यानंतर तत्काळ सफाई व औषध फवारणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य व स्वच्छता विभागाचे प्रमुख जे. एम. सोनवणे यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.