रत्नागिरी-पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली
esakal August 21, 2025 02:45 PM

पालिका निवडणुकीसाठी
काँग्रेसने कंबर कसली
काँग्रेस भवनमध्ये बैठक; प्रभाग रचनेबाबत चर्चा
रत्नागिरी, ता. २० : आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीने कंबर कसली आहे. पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन येथे झाली.
काँग्रेसचे सरचिटणीस रमेश कीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष नुरूद्दीन सय्यद आणि शहराध्यक्ष अश्पाक कादरी यांची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत केवळ निवडणुकीची तयारीच नव्हे, तर पक्षाला नवीन बळ देण्यावरही भर देण्यात आला. पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपले विचार आणि सूचना मांडल्या. पालिका निवडणुकीतील प्रभाग रचनेबाबत बैठकीत सखोल चर्चा झाली. कोणत्या प्रभागात कोणत्या उमेदवाराला संधी द्यावी, जनतेच्या अपेक्षा काय आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली. यासाठी समिती तयार करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. उदय पेठे, नंदन गांगण यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती करण्यात येईल. मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या सकारात्मक बदलांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.