हिंगोली : लाडक्या सर्जा-राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण शुक्रवारी (ता.२२) सर्वत्र उत्साहात साजरा होईल. विशेष म्हणजे वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी पोळ्याचा सण साजरा होतो.
चार शतकांपासूनची ही परंपरा अजूनही कायम आहे. पोळ्याच्या रात्री बैलजोड्यांसह शेतकरी येथील देवस्थानात मुक्कामी येतात. वसमत तालुक्यातील वाई येथे गोरक्षनाथ देवस्थान आहे. त्यामुळे गावाला वाई गोरक्षनाथ नावाने ओळखले जाते.
या ठिकाणी चारशे वर्षांपासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सण साजरा होतो. याठिकाणी मराठवाड्यासह विदर्भातून शेतकरी बैलजोड्या घेऊन येतात. त्यातही देवस्थान परिसरात पोळ्याच्या रात्रीच बैलजोड्यांसह शेतकरी मुक्कामाला थांबतात. पहाटे चारपासून देवस्थानात महाआरती सोहळा होतो. तर, त्यानंतर देवस्थानाला पाच प्रदक्षिणा घालण्यासाठी बैलजोड्यांची चढाओढच लागते. गोरक्षनाथाचे दर्शन घेतल्यास बैलांना कोणताही आजार होत नाही, अशी आख्यायिका सांगितली जाते.
शेतकऱ्यांना नाष्टा, जेवणाची सोयपोळ्याच्या सणानिमित्त याठिकाणी मोठ्या संख्येने मराठवाडा तसेच विदर्भातील शेतकरी येतात. वाई गोरखनाथ संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने येथे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची नाष्टा व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येते. यासाठी गावातील तरुणांसह ज्येष्ठ ग्रामस्थही परिश्रम घेतात. ग्रामपंचायतीतर्फेही नियोजन केले जात आहे.
बैलजोड्यांसाठी चारा-पाणीहीगोरक्षनाथ देवस्थान परिसरात येणाऱ्या बैलजोड्यांसाठी येथे मोफत चारा उपलब्ध करून दिला जातो. तसेच, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुधनाची मोफत आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यासाठी शिबिर घेतले जाते. जवळपास एक लाख बैलजोड्या येथे येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. येथे पोलिस बंदोबस्त, आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात येते.
PMP Tourist Bus : पुणे-लोणावळा मार्गावर ‘पीएमपी’ची पर्यटन बस; प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अकराव्या मार्गावर सेवा सुरू महामार्गावरील वाहतूकही वळविलीगोरक्षनाथ देवस्थानात होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत ते औंढा या महामार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने ती वळविण्यात येते. विदर्भातील वाशिम, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांसह हिंगोली, परभणी, नांदेड या भागांतून देखील शेतकरी बैलजोडी घेऊन येतात. त्यामुळे संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप येते.
वाई येथील भगवान गोरखनाथाची कृपा सदैव शेतकरी व बैलावर राहावी यासाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दर्शन घेतले जाते. ही परपंरा आम्ही भक्तिभावाने पाळतो. आमच्यासाठी हा क्षण आनंदाचा असतो.
-दुलबाराव कदम, शेतकरी, वाई
वाई येथील यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक, शेतकरी यांच्यासाठी ग्रामपंचायत चोख व्यवस्था करते. ग्रामस्थांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांसाठी भोजन, बैलांसाठी चारा उपलब्ध करून दिला जातो. ग्रामपंचायतीकडून स्वच्छता, पाणी पुरवले जाते.
गोविंद कदम, सरपंच, वाई