आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. भारतातील 4 आणि श्रीलंकेतील 1 अशा एकूण 5 शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारतीय संघाची 19 ऑगस्टला घोषणा करण्यात आली. त्यानुसार हरमनप्रीत कौर भारताचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रं असणार आहेत. त्यानंतर आता इंग्लंड महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तसेच हीथर नाईट हीचं अनेक महिन्यांनंतर कमबॅक झालं आहे. तसेच आशियातील स्थितीचा विचार करता निवड समितीने या 15 सदस्यीय संघात 4 फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे.
हीथरचं अनेक महिन्यानंतर संघात पुनरागमन झालं आहे. हीथरने जानेवारी 2025 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर हीथरला दुखापतीमुळे अनेक मालिकांना मुकावं लागलं. तसेच सारा ग्लेन आणि डेनी व्याट या दोघांचंही कमबॅक झालं आहे. या दोघी टीम इंडिया विरुद्ध मायदेशात झालेल्या एकदिवसीय संघात नव्हत्या. ग्लेन 4 प्रमुख फिरकीपटूंपैकी एक आहे. तसेच इंग्लंड संघातील 6 खेळाडूंची वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ ठरणार आहे.
दरम्यान इंग्लंड वनडे वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 3 ऑक्टोबरला खेळणार आहे. इंग्लंडसमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. त्यानंतर इंग्लंड बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध 2 हात करणार आहे. चौथ्या सामन्यात इंग्लंड श्रीलंकेत पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. तर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सामना हा 19 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तर इंग्लंडसमोर साखळी फेरीतील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 साठी इंग्लंड वूमन्स टीम : नॅट सायव्हर-ब्रँट (कॅप्टन), एम अर्लट, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, एलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फायलर, सारा ग्लेन, एमी जोन्स, हीथर नाइट, एम्मा लॅम्ब, लिन्सी स्मिथ आणि डॅनी व्याट-हॉज.