मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत. अशातच मराठा आरक्षण मागणं हा जरांगे पाटील यांचा फास आहे. ओबीसी आरक्षण संपवणे हा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केलाय. त्यांना आरक्षणाचे काही पडले नसून ओबीसीचे आरक्षण संपवायचे आहे असं म्हणत ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा काढण्याची घोषणा लक्ष्मण हाकेंनी केली आहे. यानंतर जरांगे समर्थक आक्रमक झाले आहेत.
लक्ष्मण हाके यांचा एका व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते म्हणत आहेत की, ‘काय आहे, माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांच्या पोटात दुखतंय.या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र टीव्ही 9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. यानंतर आता जरांगे समर्थक धनाजी साखळकर यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे.
धनाजी साखळकर म्हणाले की, ‘जो कोणी कोल्हापूरी चपलेने लक्ष्मण हाकेंच्या कानाखाली मारेन आणि त्यांना चपलेचा हार घालेन त्याला एक लाख अकरा हजार रुपयांचं बक्षीस मी जाहीर करतो. तसेच लक्ष्मण हाके यांनी सोलापूरमध्ये फिरकले तर ओबीसी, मराठा आणि दलित समाजाकडून त्यांना चपलेचा हार घातला जाईल असंही साखळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता लक्ष्मण हाके यांची चिंता वाढली आहे.
हाके यांनी केला खुलासामाळी समाजावर केलेल्या विधानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यावर खुलासा केला आहे. हा व्हिडिओ माझा आहे. पण त्यातील आवाज आपला नसल्याचा दावा हाकेंनी केला. ओबीसी जातींमध्ये फुट पाडण्यासाठी आणि त्यांच्यात भांडणं लावण्यासाठी हा प्रकार करण्यात येत असल्याचा आरोप हाकेंनी केला. असं वक्तव्य करायला मी काही वेडा नाही असं हाकेंनी म्हटलं आहे.
या व्हिडिओवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटले की, ‘माळी समाजाने नवनाथ वाघमारे यांच्या आधाी लक्ष्मण हाके यांचा सत्कार केला. त्यांचा सन्मान केला. त्याच हाकेंच्या तोंडून असं वक्तव्य निघत असेल तर खरंच दुर्देव आहे.’