कोयना धरणातील विसर्ग १९ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला
वारणा धरणाचे दरवाजे बंद करून विसर्ग थांबवण्यात आला, फक्त विद्युत निर्मितीसाठी विसर्ग १६३० क्युसेक सुरू आहे.
सांगलीत पाणीपातळीत वाढ होत असल्याने स्थलांतरित कुटुंबांची संख्या वाढली
जिल्ह्यातील ४१ गावे पुराने बाधित झाल्याने ग्रामीण भागातही स्थलांतर करावे लागले
१९ तासांत साडेतीन फुटांनी पाणीपातळीत वाढ झाली
कऱ्हाड, बहे, भिलवडीत पाणी उतरू लागल्यानंतर सांगलीकरांनी नि:श्वास सोडला
विसर्ग (क्युसेकमध्ये)
कोयना- २१,९००, वारणा- १,६३०, आलमट्टी- २,५०,०००
Sangli Flood Threat Averted : कोयना धरणातील विसर्गात ९५ हजार ३०० क्युसेकवरून २८ हजारांपर्यंत केलेली घट; वारणा धरणाच्या वक्र दरवाजातून बंद केलेला विसर्ग आणि पावसाने सर्वदूर दिलेली उघडीप यामुळे कृष्णा-वारणा काठावरचे महापुराचे संकट टळले. कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ धोका पातळीला स्पर्श करून परतू लागल्याने सांगलीकरांनी नि:श्वास सोडला. सायंकाळी ७ वाजता ४३.६ फूट पातळी झाली आणि त्यानंतर ती स्थिरावली. कऱ्हाड येथे कोयना पुलाजवळ १९ तासांत ८ फूट पाणी उतरले असून, सांगली जिल्ह्यात बहे येथे चार फुटांनी पाणी पातळी कमी झाली आहे. सांगलीत शुक्रवारी दुपारपर्यंत पाणीपातळीत मोठी घट होईल, असा अंदाज आहे.
बुधवारी (ता. २०) सकाळपासून कोयना, धोम, कण्हेर, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला होता. धरण पाणलोट क्षेत्राच्या बाहेर पावसाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे महापुराचे संकट टळू शकते, अशी आशा निर्माण झाली होती. रात्री पाऊस परतला नाही, आज दिवसभर पावसाने उघडीप दिली आणि सर्वांनीच नि:श्वास टाकला. बुधवारी मध्यरात्रीपासून कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. त्याचा परिणाम रात्रीच दिसू लागला. पाणी स्थिर होऊन उतरू लागले.
Sangli Rain Update: ‘कृष्णे नदीच्या पुरामुळे नदीकाठी ग्रामस्थांची धावपळ'; ५२ कुटुंबांचे स्थलांतर, नऊ रस्त्यांवरील वाहतूक बंदकऱ्हाड, बहे, भिलवडी येथे पाण्याला उतार सुरू झाल्यानंतर सांगलीकडे लक्ष लागले. दिवसभर संथ गतीने पाणी वाढले. रात्री उशिरा ते स्थिर होऊ उतरू लागले. त्याआधी सांगली शहरासह जिल्ह्याभरात २ हजार ३१३ जणांचे स्थलांतर करण्यात आले. निवारा केंद्रासह लोकांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला. जनावरांनाही सुरक्षित स्थळी नेण्यात आले. दिवसभर ही घाई सुरू होती. प्रशासनाने त्याबाबत प्रचंड दक्षता घेतली.
इंच-इंच वाढले पाणी
सांगलीत आयर्विन पुलाजवळ बुधवारी मध्यरात्री पाणीपातळी ४०.६ फूट झाली. ती आज सकाळी ७ वाजता ४२ फुटांवर पोहोचली. त्यानंतर पाणी पातळीतील वाढीचा वेग मंदावला. तासाला तीन इंच, दोन इंच आणि सायंकाळी एकेक इंचाने पातळी वाढली. सायंकाळी सात वाजता ४३.६ फुटांवर पाणीपातळी पोहोचली होती. पाटबंधारे विभागाने ४३ फुटांपर्यंत पाणी वाढेल, असा अंदाज वर्तवला होता.
बहेत उतार
वाळवा तालुक्यातील बहे येथे पहाटे दोन वाजता पाणीपातळी २१.४ इंचावर स्थिरावली. त्यानंतर पाणी उतरू लागले. तेथे सकाळी ७ वाजता २०.१० फूट, सकाळी १० वाजता २०.१ फूट, दुपारी २ वाजता १९.१ फूट, सायंकाळी ७ वाजता १७.६ फूट इतके पाणी होते. बहेतील या स्थितीची माहिती सांगलीकरांना दिलासा देणारी ठरत होती. लोकांचे सांगलीच्या बरोबरीने बहेतील पातळीकडे लक्ष होते.
धरणांतील पाणीसाठा (कंसात साठा क्षमता) (आकडे टीएमसीमध्ये)
कोयना- ९८.९९ (१०५.२५), धोम- १३.०५ (१३.५०), कण्हेर- ९.५६ (१०.१०), धोम- बलकवडी- ३.८२ (४.०८), उरमोडी- ९.७० (९.९७), तारळी- ५.५५ (५.८५), वारणा- ३१.४२ (३४.४०), राधानगरी- ८.२७ (८.३६), दूधगंगा- २२.०७ (२५.४०), तुळशी- ३.३९ (३.४७), कासारी- २.६३ (२.७७), पाटगाव- ३.७२ (३.७२), आलमट्टी- ९८.८८ (१२३).
कोयना, वारणा धरणातील विसर्ग कमी
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सायंकाळी ६ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ७ फुटांवरून ४ फूट ६ इंचांपर्यंत खाली आणले गेले. त्यातून ३४,६०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला. कोयना धरण पायथा विद्युतगृहाची दोन्ही युनिट सुरू असून, त्याद्वारे २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३६,७०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. काल रात्री उशिरापर्यंत तो सलग ९५ हजार ६०० क्युसेक होता. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता कमी झाल्याने वक्र दरवाजातून सुरू असणारा विसर्ग सायंकाळी ६ वाजता बंद करण्यात आला. सध्या फक्त विद्युत गृहातून १६३० क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. तेवढेच पाणी वारणा नदीत सोडले जात असल्याने पाणीपातळी झपाट्याने कमी होणार आहे.