रावेत, ता. २२ : रावेत परिसरातील प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) २ साठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ९३४ लाभार्थ्यांना घरे मिळाली नसल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. त्यांना किवळे येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. रावेत येथील प्रकल्पामध्ये ९२५ ते ९४८ सदनिकांच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची कार्यवाही चालू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबवली जाते. या योजनेच्या दोन्ही टप्प्यांमुळे रावेत परिसरातील शेकडो नागरिकांना घरकुलाचा दिलासा मिळण्याची आशा आहे.
न्यायालयीन स्थगिती मागे
प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यात रावेत येथील आरक्षित जागेवर ९३४ घरांचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी कामाचे आदेश काढून काही प्रमाणात कामही सुरू झाले होते. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांनी योग्य मोबदला न मिळाल्याने उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने स्थगिती दिल्याने हा पहिला टप्पा ठप्प झाला होता. अलीकडेच महापालिका प्रशासनाने न्यायालयीन लढाईत यश मिळवत स्थगिती हटविली आहे. त्यामुळे आता या टप्प्यातील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
३२५ चौरस फूट घरे
प्रधानमंत्री आवास योजना - २ मध्ये ९२५ ते ९४८ घरांचे नियोजन असून प्रत्येकी ३२५ चौरस फुटांचे घर नागरिकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या मान्यता मिळविण्याचे काम सुरू आहे. या योजनेसाठी शशी प्रभू ॲण्ड असोसिएशन यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्राथमिक स्तरावर विकसित आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून विविध मान्यता मिळाल्यानंतर पुढील टप्पा सुरू होणार आहे. रावेत परिसरातील नागरिक आणि पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांमध्ये या घडामोडींनंतर समाधानाचे वातावरण आहे. न्यायालयीन प्रक्रिया आणि प्रशासनिक विलंबामुळे आधीच वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्याचे काम वेळेत पूर्ण होऊन लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावीत, असे लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी प्राथमिक स्तरावरची कामे सुरू आहेत. सर्व आवश्यक मान्यता घेऊन पुढील कामकाज सुरू होईल. चालू दर सूचीनुसार दर निश्चित केले जातील.
- अनघा पाठक, कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री आवास योजना, रावेत - २
पहिल्या टप्प्यातील ९३४ लाभार्थ्यांना किवळे येथे (ईडब्ल्यूएस) योजनेअंतर्गत घरे दिली जाणार आहेत. त्यासाठी दर १३ ते १४ लाखांच्या दरम्यान निश्चित केला जाईल. अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- अण्णा बोदडे, उपायुक्त, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग