Pension Fraud: माजी सैनिकाच्या पत्नीला पेन्शन सुरु करून देतो म्हणत तब्बल २० लाख ४३ हजारांचा गंडा
esakal August 23, 2025 08:45 AM

हिंगोली : वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन येथे माजी सैनिकाच्या पत्नीला पेन्शन सुरु करण्याचे सांगत त्यांच्या बँक खात्यातील २० लाख ४३ हजार रुपये परस्पर आपल्या खात्यात वळवून फसवणुक करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणावर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २१ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

 वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन येथील शांताबाई कुटे यांचे पती कुंडलीक कुटे हे सैन्यदलात होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांचे सेवानिवृ्ती वेतनाचे पैसे व इतर रक्कम त्यांना मिळाली होती. त्यानंतर सन २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे सेवानिवृत्ती वेतन शांताबाई यांच्या वसमत येथील भारतीय स्टेट बँकेच्या बँक खात्यात जमा केले जात होते.

दरम्यान, सेवानिवृत्ती वेतनाची थकबाकी मिळण्यासाठी शांताबाई यांनी पाठपुरावा सुरु केला होता. याकाळात त्यांच्या एका नातेवाईकाने शांताबाई यांची ओळख निलेेश गांगे (रा. मुकुंदवाडी, जि. छत्रपतीसंभाजीनगर) या तरुणासोबत करून दिली. यावेली निलेश याने शांताबाई यांना तुमच्या पतीचे सैनिकाचे पेन्शन सुरु करून देतो असे सांगत कागदपत्रे तयार केली.

त्यानंतर त्यांचा विश्ावस बसल्यानंतर त्याने शांताबाई यांच्याअशिक्षीतपणाचा गैरफायदा घेत त्याने यांचे काही कागदपत्रावर अंगठ्याचे ठसे घेतले. त्यानंतर त्यांच्या भारतीय स्टेट बँक शाखा वसमत येथील बँकेतून त्यांच्या खात्यात जमा झालेली पेन्शनची थकबाकी व सुरु असलेली पेन्शनची रक्कम सुमारे २०.४३ लाख रुपये आपल्या खात्यात वळवून घेतली.

Hingoli Festival: बैलांसोबत ट्रॅक्टरलाही सन्मान; कनेरगावचा आगळावेगळा पोळा, २५ वर्षांची परंपरा

दरम्यान, काही दिवसानंतर शांताबाई यांना संशय आल्याने त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या बँक खात्यातील २०.४३ लाख रुपयांची रक्कम निलेश याने त्याच्या खात्यात वळवून घेतल्याचे दिसून आले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी निलेश गांगे याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाध, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख समी पुढील तपास करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.