Cricket : नेपाळला पाकिस्तान विरुद्ध 3 धावांची गरज, शेवटच्या बॉलवर कोण जिंकलं? पाहा व्हीडिओ
Tv9 Marathi August 23, 2025 05:45 AM

ऑस्ट्रेलियात टॉप एन्ड टी 20 मालिकेत नेपाळ विरुद्ध पाकिस्तान शाहीन यांच्यात 22 ऑगस्टला सामना खेळवण्यात आला. डार्विन मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. नेपाळने शेवटपर्यंत लढत दिली. नेपाळला हा सामना जिंकता आला नाही.मात्र नेपाळने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूपर्यंत झुंजवलं. नेपाळने पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले. त्यामुळे पाकिस्तानच्या विजयापेक्षा नेपाळच्या पराभवाची जास्त चर्चा पाहायला मिळत आहे. नेपाळला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 3 धावांची गरज होती. मात्र नेपाळला 1 धावच करता आली. पाकिस्तान शाहीनने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळला 145 धावांचा पाठलाग करताना 143 पर्यंतच पोहचता आलं.

नेपाळची बॅटिंग

नेपाळची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. नेपाळने कुशल भुर्टेल याच्या रुपात 6 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन रोहित पौडेल आणि आसिफ शेख या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आसिफ 27 धावा करुन बाद झाला. तर नेपाळने 61 धावांवर गुलशन झा याच्या रुपात तिसरी विकेट गमावली.

त्यानंतर रोहित आणि दीपेंद्र सिंह या दोघांनी नेपाळला सामन्यात कायम ठेवलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 47 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे नेपाळने सामन्यावर घट्ट पकड मिळवली. पाकिस्तान सामन्यात बॅकफुटवर गेली होती. मात्र तेव्हाच पाकिस्तानने कमबॅक केलं. पाकिस्तानने नेपाळचा कॅप्टन रोहितला निर्णायक क्षणी आऊट केलं. रोहितने 44 बॉलमध्ये 52 रन्स केल्या. त्यानंतर दीपेंद्र सिंह याने नेपाळला विजयी करण्याची जबाबदारी घेतली. दीपेंद्रच्या झुंजार खेळीमुळे नेपाळने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. त्यामुळे आता नेपाळला शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावांची गरज होती.

शेवटच्या ओव्हरचा थरार

पाकिस्तानकडून फिरकीपटू फैजल अक्रम शेवटची ओव्हर टाकायला आला. फैजलच्या पहिल्या बॉलवर कुशल मल्ला याने 1 धाव घेत दीपेंद्रला स्ट्राईक दिली. दीपेंद्रने दुसऱ्या बॉलवर 3 रन्स घेतल्या. त्यामुळे आता नेपाळला 4 बॉलमध्ये 4 रन्सची गरज होती. मात्र तिसऱ्या बॉलवर नेपाळने विकेट गमावली. कुशल मल्ला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला.

नेपाळचा शेवटच्या बॉलवर पराभव, पाकिस्तान रडत रडत जिंकली

Faisal Akram bowling the final over of the innings to defend 8 runs against Nepal in the Top-End T20 series #PakistanCricket | #TopEndT20 pic.twitter.com/kEfR95RG23

— Usman (@jamilmusman_)

आरिफ शेख याला चौथ्या बॉलवर एकही धाव घेता आली नाही.आरिफने पाचव्या बॉलवर 1 धाव घेतली. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर नेपाळला 3 धावांची गरज होती. दीपेंद्रने शेवटच्या बॉलवर रिव्हर्स स्वीप शॉट मारला. मात्र नेपाळला फक्त 1 धावच मिळाली. अशाप्रकारे पाकिस्तानने या क्रिकेट सामन्यात 1 धावेने विजय मिळवला. दीपेंद्रने 21 बॉलमध्ये 41 रन्स केल्या. मात्र दीपेंद्र नेपाळला विजयी करण्यात अपयशी ठरला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.