Asian Shooting Championship: भारतीय युवा नेमबाजांचे घवघवीत यश; आशियाई नेमबाजी, १४ सुवर्णांसह २६ पदकांवर मोहर
esakal August 23, 2025 02:45 AM

नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांचे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील घवघवीत यश गुरुवारीही कायम राहिले. भारताच्या युवा नेमबाजांनी चार सुवर्णपदकांची कमाई केली. आता भारतीय खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत १४ सुवर्ण, सहा रौप्य व सहा ब्राँझ अशी एकूण २६ पदकांची कमाई केली आहे. पदकतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम आहे.

१० मीटर एअर रायफल पुरुषांच्या ज्युनियर प्रकारात अभिनव शॉ, नरेन प्रणव व हिमांशू या भारतीय नेमबाजांनी एकूण १८९०.१ गुणांची कमाई करीत भारताला सांघिक विभागात सुवर्णपदक पटकावून दिले. चीनच्या खेळाडूंनी या प्रकारात रौप्यपदक पटकावले. तसेच कोरियन नेमबाजांनी ब्राँझपदकावर नाव कोरले. १० मीटर एअर रायफल पुरुषांच्या ज्युनियर वैयक्तिक प्रकारात अभिनव शॉ याने २५०.४ गुणांसह सुवर्णपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली. कोरियाच्या ली ह्यूनसियो याने रौप्यपदक आणि चीनच्या मा सिहान याने ब्राँझपदक पटकावले. भारताने या विभागात आशियाई व जागतिक विक्रम नोंदवला.

महिलांच्या स्कीट प्रकारात वर्चस्व

महिलांच्या स्कीट ज्युनियर प्रकारात भारतीय नेमबाजांचे वर्चस्व प्रकर्षाने दिसून आले. मानसी रघुवंशी हिने ५३ गुणांची कमाई करीत सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात भारताच्याच यशस्वी राठोड हिने ५२ गुणांची कमाई करीत रौप्यपदक आपल्या नावे केले. कझाकस्तानच्या लिदीया बाशारोवा हिने ब्राँझपदक पटकावले.

पुरुषांच्या स्कीट प्रकारात दोन पदके

भारतीय नेमबाजांनी पुरुषांच्या स्कीट ज्युनियर प्रकारात दोन पदके पटकावली. कझाकस्तानच्या अर्टीओम सेदेलनिकोव याने ५३ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. भारताच्या हरमेहर सिंग याने ५२ गुणांसह रौप्यपदक जिंकले. ज्योतीरादित्य सिसोडिया याने ४३ गुणांसह ब्राँझपदकावर हक्क सांगितला. पुरुषांच्या स्कीट सांघिक प्रकारात अतुल सिंग, ईशान सिंग व हरमेहर सिंग यांनी ३३८ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

Salima Tete: सलिमा टेटेकडे महिला संघाचे नेतृत्व; आशियाई हॉकी करंडक, भारताचा २० खेळाडूंचा संघ सज्ज रुद्रांक्ष पाटील चौथ्या स्थानी

वरिष्ठ गटामध्ये भारताच्या रुद्रांक्ष पाटीलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात तो चौथ्या स्थानी राहिला. कझाकस्तानचा इस्लाम सातपायेव याने सुवर्णपदक जिंकले. चीनच्या डिंगके लू याने रौप्यपदक आणि कोरियाच्या हजुन पार्क याने ब्राँझपदक पटकावले. भारताचाच अर्जुन बाबुता पाचव्या स्थानी राहिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.