Kolhapur Flood News : कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे नदीची पाणी पातळीत वाढ संथ असली तरी यावर्षी पुराचे काही ठोकताळे नव्याने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी नदीची पाणी पातळी ४५ फुटांवर गेली की कसबा बावडा-शिये रस्त्यावर पाणी येत होते. मात्र, यावर्षी ते ४१ फुटांवरच आले आहे. नदीची पाणी पातळी ४३ फुटांवर गेली की केर्ली येथे पाणी येऊन कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद होत होता. मात्र यावर्षी ४० फुटांवरच या महामार्गावर पाणी आले. पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव यामुळे कमी पातळीतच हे मार्ग पाण्याखाली जात आहेत.
सर्वेक्षणाची गरज
शिरोली पूल ते शिंगणापूर बंधारा या अंतरातील नदीच्या पूरप्रवण क्षेत्रातील बांधकामे, रस्त्यांचे भराव यांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. रस्ता रुंदीकरणासाठी बालिंगा पुलावजळ जी भर घातली आहे. त्याचाही परिणाम पुराच्या पाण्यावर होत आहे. त्यामुळे फेरसर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
पुराचे ठोकताळे बदलावे लागणार
नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात झालेली बांधकामे, शेत जमिनीची उंची वाढवणे आणि महामार्गांसाठी घातलेले भराव यामुळे पुराचे पाणी पसरण्यास मर्यादा येतात. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढते. त्यामुळे पुराचे ठोकताळे आता बदलावे लागणार आहेत.
उदाहरण १
पंचगंगेची पाणी पातळी किती वाढली की कोणता भाग पाण्याखाली जाणार याचे ठोकताळे निश्चित केले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कमी कालावधीत आणि निश्चित केलेल्या पातळीपेक्षा कमी पातळीवरच पुराचे पाणी रस्त्यावर आल्याचे दिसून येते. याचे ठळक उदाहरण म्हणजे कसबा बावडा-शिये रस्त्याचे आहे. २०१९-२० या दोन्ही वर्षांच्या महापुरामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फुटांवर गेली की कसबा बावडा-शिये रस्त्यावर पाणी येत होते. मात्र, या वर्षी ४१ फुटांवरच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.
उदाहरण २
असेच दुसरे उदाहरण कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचे आहे. या महामार्गावर केर्लीजवळ महामार्गावर पाणी येते. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो. पंचगंगेची पातळी ४३ फुटांवर गेली की, या रस्त्यावर पाणी येत असल्याचे आजपर्यंत दिसून आले होते. मात्र, या वर्षी नदीची पातळी ४० फुटांवर गेल्यावरच येथे पाणी आल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. हे दोन्ही मार्ग हे प्रातिनिधीक उदाहरणे आहेत.
Collector Kolhapur : पंचगंगा नदी धोका पातळीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी रात्रीपासूनच कसली कंबर; नागरिकांचे स्थलांतर सुरूशेतीचे नुकसान टाळण्यासाठी बांधकामे
१ कसबा बावड्याच्या पश्चिमेला पूर्वी पूर्ण शेती होती. नदीकाठची सुपीक जमीन असल्याने उत्पन्नही चांगले येत होते. मात्र, २०१९-२० या सलग दोन वर्षी पुराचे पाणी आल्याने शेतीचे नुकसान झाले.
२ शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेती न करता जमिनीचा उपयोग अन्य कारणांसाठी केला.
३ या भागात मंगल कार्यालये, वाहने धुण्यासाठीचे वॉशिंग, सर्व्हिसिंग सेंटर, हॉटेल, फार्म हाऊस झाले आहेत. यासाठी जमिनीची उंची वाढवण्याचे प्रकारही काही ठिकाणी झाले आहेत.
४ त्यामुळे पुराचे पाणी पसरण्यासाठी जागा उरलेली नाही. परिणामी नदीच्या पाणीपातळीवर झपाट्याने वाढ होते.
नदीपात्रातील अतिक्रमणे आणि पूरप्रवण क्षेत्रातील बांधकाम यामुळे पुराचे पाणी पसरण्यास मर्यादा येतात. त्यामुळे यांचे सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे.
- अजय कोराणे, अध्यक्ष, इंजिनिअर अँड आर्किटेक्ट असोसिएशन