पृथ्वी शॉने एक शतक ठोकतात आयपीएल फ्रेंचायझींच्या पायघड्या! मिनी लिलावात असं काही घडण्याची शक्यता
Tv9 Marathi August 23, 2025 12:45 AM

पृथ्वी शॉ हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कारण त्याच्या क्रिकेट फॉर्ममुळे तो संघातील स्थान गमवून बसला आहे. गेल्या काही महिन्यात त्याने एक एक करत बरंच काही गमावलं आहे. टीम इंडियातील स्थान गेलं, त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याला जागा मिळाली. तसेच आयपीएल मेगा लिलावातही त्याला संघात घेण्यास कोणीही रस दाखवला नाही. त्यामुळे त्याने आता नवी रणनिती अवलंबली आहे. मुंबई क्रिकेटला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र संघात सहभागी झाला आहे. बुची बाबू स्पर्धेत पृथ्वी शॉ महाराष्ट्र संघाकडून खेळत आहे. पृथ्वी शॉने पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात छत्तीसगडविरुद्ध शतक ठोकलं. पहिल्या डावात त्याने 15 चौकार आणि एक षटकार मारत 111 धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सूर गवसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आयपीएल फ्रेंचायझीने त्याच्यासाठी पायघड्या घातल्याचं बोललं जात आहे. तीन फ्रेंचायझींनी त्याला खरेदी करण्याची योजना आखली आहे.

पृथ्वी शॉ शेवटचा 2024 च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला होता. दिल्ली कॅपिटल्सकडून आठ सामने खेळले आणि 24.75 च्या सरासरीने 198 धावा केल्या. यामुळेच दिल्ली फ्रँचायझीने त्याला 2025 च्या हंगामापूर्वी रिलीज केले. मेगा लिलावात त्या खरेदी करण्यास कोणीही रस दाखवला नाही. त्यामुळे त्याच्या पदरी निराशा पडली. पृथ्वी शॉचा सध्याचा फॉर्म पाहता कोलकाता नाईट रायडर्स त्याला संघात घेण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. 2025 आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी खूपच निराशाजनक होती. 14 पैकी फक्त 5 सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे संघात उलथापालथ केली जाणार आहे. त्यात संघाकडे चांगला ओपनर नसल्याने त्याची जागा भरून काढण्यासाठी योग्य खेळाडू आहे. पृथ्वी शॉ हा चांगला पर्यात ठरू शकतो.

आयीएल 2025 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघही प्लेऑफची पायरी चढू शकला नाही. सुरुवातीला चांगली कामगिरी केली. पण त्यानंतर संघाने नांगी टाकली. या स्पर्धेत दिल्लीने सलामीसाठी चार खेळाडूंना संधी दिली. फाफ डु प्लेसिसने 9 डावात 202 धावा केल्या. जॅक फ्रेझर मॅकगर्कने 6 डावात 55 धावा, केएल राहुलने 539 धावा, तर अभिषेक पोरेलने 301 धावा केल्या. त्यामुळे संघाला एक आश्वासक सुरुवात करून देणाऱ्या फलंदाजाची आवश्यकता आहे. ही गरज पृथ्वी शॉ भरून काढू शकतो. चेन्नई सुपर किंग्सची स्थितीही वाईट आहे. मागच्या पर्वात 14 पैकी फक्त 4 सामने जिंकले. टॉप ऑर्डर पूर्णपणे फेल गेली. पृथ्वी शॉमुळे चेन्नईचा संघ मजबूत स्थितीत येऊ शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.