एमआरएफ (MRF) हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर मजबूत आणि टिकाऊ टायर्स येतात. आज एमआरएफ ही भारतातील सर्वात मोठी टायर बनवणारी कंपनी आहे आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून तिची ओळख आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का व त्यांनी एका लहानशा सुरुवातीतून इतकी मोठी ओळख कशी मिळाली, याबद्दल आपण जाणून घेऊया.
मद्रासमधून फुग्यांची सुरुवात
एमआरएफची (Madras Rubber Factory) स्थापना 1946 मध्ये के. एम. मॅमन मपिल्लई यांनी मद्रास येथे केली होती. त्यावेळी कंपनीचे नाव मद्रास रबर फॅक्टरी असे होते. सुरुवातीला ही कंपनी फक्त खेळण्यांचे फुगे बनवत असे. स्वतः मपिल्लई हे फुगे दुकानांमध्ये, जत्रेत आणि रस्त्यांवर बॅगेत भरून विकायचे. ही एक खूप छोटी सुरुवात होती, पण त्यांच्या मोठ्या स्वप्नांची ती पहिली पायरी होती.
रबर उद्योगात पहिले पाऊल
1950 च्या दशकात, एमआरएफने टायर दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रेड रबरचे उत्पादन सुरू केले. त्या काळात हे बाजारपेठ विदेशी कंपन्यांच्या ताब्यात होती. परंतु, एमआरएफने आपल्या उत्पादनांची गुणवत्ता आणि किफायतशीर किंमतीमुळे बाजारात स्वतःची जागा निर्माण केली. ही कंपनीसाठी एक महत्त्वाची टर्निंग पॉईंट ठरली.
टायर उद्योगात प्रवेश
1960 मध्ये एमआरएफने अमेरिकन कंपनी ‘मॅनस्फिल्ड टायर अँड रबर’सोबत भागीदारी करून टायर बनवण्यास सुरुवात केली. 1961 मध्ये एमआरएफचा पहिला टायर बाजारात आला आणि काही वर्षांतच कंपनीने देशभरात आपलं मजबूत जाळं (Network) निर्माण केलं.
आंतरराष्ट्रीय ओळख आणि आजची स्थिती
1967 मध्ये एमआरएफने अमेरिकेत टायर्सची निर्यात करणारी पहिली भारतीय कंपनी बनण्याचा मान मिळवला. त्यानंतर कंपनीने जाहिराती आणि मोटरस्पोर्ट्स, क्रिकेट यांसारख्या खेळांमधील प्रायोजकत्वाच्या माध्यमातून आपली ओळख आणखी मजबूत केली.
आज एमआरएफ कार, बाईक, ट्रक, बसपासून ते लढाऊ विमान ‘सुखोई’पर्यंतचे टायर्स बनवते. तिच्या टायर्सची मजबूत पकड आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी जगभरातून कौतुक होते. एमआरएफचे उत्पादन प्रकल्प भारतातील विविध राज्यांमध्ये पसरले आहेत आणि दरवर्षी लाखो टायर्सचे उत्पादन करून त्यांची अनेक देशांमध्ये निर्यात करतात. टायर्सच्या व्यतिरिक्त एमआरएफ समूहाने खेळणी बनवणारी कंपनी ‘फनस्कूल’, पेंट आणि मोटर स्पोर्ट्समध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. एका छोट्या फुग्यांच्या कंपनीने आज भारतीय औद्योगिक जगतासाठी एक प्रेरणास्थान बनून दाखवलं आहे.