पुणे : मुंबईच्या धर्तीवर सारसबाग येथील चौपाटीचा पुनर्विकास करण्याचे महापालिकेने निश्चित केले. जुना आराखडा रद्द करून नवीन आराखडाही मंजूर झाला. महापालिका आयुक्तांसमोर संबंधित प्रकल्पाच्या दृक्-श्राव्य सादरीकरणाची चर्चाही झाली. इतकेच नव्हे, तर संबंधित कामासाठी निविदाही काढण्यात आली. दरम्यान, संबंधित चौपाटीची जागा ही रस्त्याचा भाग असल्याने तेथे पुनर्विकास प्रकल्प करता येणार नाही, असे महापालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर अखेर सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
पुण्यासह बाहेर गावांहून येणाऱ्या पर्यटकांसाठी सारसबाग आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. सुट्ट्यांच्या दिवशी सारसबागेतील ‘तळ्यातील गणपती’चे दर्शन, मुलांना पेशवे उद्यानाची सफर घडविणे आणि त्यानंतर चौपाटीवरील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यास पर्यटकांकडून प्राधान्य दिले जाते. याबरोबरच प्रवासी, विद्यार्थी, रात्री उशिरा कामावरून परतणारे नोकरदारांनाही रात्रीच्या वेळी जेवणासाठी सारसबाग चौपाटी हक्काचे ठिकाण ठरते.
२०१९ मध्ये राज्य सरकारने मुंबईतील चौपाटीच्या धर्तीवर सारसबाग चौपाटीला ‘चांगले खाद्यपदार्थ मिळणारे स्वच्छ ठिकाण’ असा खास दर्जा दिला. दरम्यान, सारसबाग चौपाटीवरील अतिक्रमणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अडीच वर्षांपूर्वी तेथे कारवाई केली होती. काही गाळ्यांना टाळे ठोकले होते. त्यावरून सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुढे आला होता.
अशी होती पुनर्विकास प्रकल्पाची वैशिष्ट्येसारसबाग पुनर्विकासात दोन मजल्यांवर होणार होते ७८ गाळे
तळमजल्यावर ५४, तर पहिल्या मजल्यावर २४ गाळे
आकर्षक रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, ग्राहकांना बसण्यासाठी विशेष व्यवस्था
२०० वाहनांसाठी भूमिगत पार्किंग व्यवस्था
महापालिकेने सारसबाग चौपाटीच्या पुनर्विकासासाठी वास्तुविशारदांकडून आराखडे मागविले होते. त्यातील एका आराखड्याला मान्यता मिळाली. नंतर अचानक संबंधित आराखड्याचे काम थांबवण्यात आले
त्यानंतर पूर्वीच्या आराखड्यात बदल करून डिसेंबर २०२३ मध्ये नवीन आराखडा महापालिकेच्या अंदाज समितीने मंजूर केला होता
चौपाटीच्या पुनर्विकासासाठी प्रारंभी आठ कोटी रुपये खर्च येणार होता, हा खर्च नंतर २२ कोटी २२ लाख ३० हजार रुपयांवर पोचला होता
सर्व प्रक्रिया होऊनही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रशासनाने त्या वेळी या कामाकडे दुर्लक्ष केले होते. पुढे महापालिकेने या कामासाठी निविदा देखील काढल्या.
पुनर्विकासासंबंधी महापालिका अधिकाऱ्यांची काही महिन्यांपूर्वी बैठक झाली. या बैठकीमध्ये ‘संबंधित रस्ता हा शहर नियोजनातील रस्ता आहे, हा रस्ता चौपाटीच्या पुनर्विकासासाठी कमी कसा करायचा’ अशी भूमिका पथ विभागाने मांडली होती
प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिका प्रशासनावर चौपाटीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द करण्याची वेळ आली
सारसबाग चौपाटी पुनर्विकास मुद्दा अंदाज समितीपुढे आला होता. त्यामध्ये संबंधित चौपाटी असलेली जागा ही रस्त्याची आहे. संबंधित रस्ता हा शहर नियोजनातील रस्ता असल्याने तेथे पुनर्विकास करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे.
- संदीप खलाटे, प्रमुख, अतिक्रमण विभाग, महापालिका