Mumbai Goa highway : मुंबई-गोवा महामार्गावरील आजपासून अवजड वाहतूक बंद, ३ टप्प्यात निर्बंध, वाचा सविस्तर
Saam TV August 23, 2025 10:45 PM
  • 23–28 ऑगस्ट सतत, तसेच 31 ऑगस्ट, 2 सप्टेंबर आणि 6–7 सप्टेंबर रोजी अवजड वाहतूक बंद.

  • जीवनावश्यक माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना आरटीओ प्रवेशपत्रासह सूट.

  • रत्नागिरी आरटीओची 24x7 गस्त; अपघात व्यवस्थेसाठी क्रेन्स व दुरुस्ती पथके सज्ज.

  • गणेशोत्सवातील चाकरमान्यांची गर्दी आणि अपघात टाळण्यासाठी निर्बंध लागू.

Mumbai–Goa Highway heavy vehicle ban dates and timings : मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जायला सुरुवात झाली आहे. त्यांच्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते. तसेच अपघाताची शक्यता असते. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. 23 ते 28 ऑगस्ट, 31 ऑगस्ट व 2 सप्टेंबर रोजी दिवसभर तसेच 6 व 7 सप्टेंबर या कालावधीत ही बंदी राहणार आहे. दूध, औषधे, इंधन भाजीपाला, नाशिवंत माल अशा साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू असणार नाही. मात्र त्यांना महामार्ग विभागाकडून प्रवेशपत्र घ्यावे लागणार आहे. महामार्गावर अपघात झाल्यास वाहने तातडीने बाजूला करण्यासाठी केन्स तैनात ठेवण्यात आल्या आहेत, तसेच वाहनदुरुस्ती पथकही सज्ज असणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून तीन टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणपतीचे आगमन होत असताना किंवा पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहतूक बंद राहणार आहे. 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत असताना 31 ऑगस्ट सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तसेच 2 सप्टेंबर रोजी देखील सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे.

महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओची पथक तैनात करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी आरटीओ विभागाची पथके कार्यरत असतील. कशेडी घाटापासून ते खारेपाटण पर्यंत आरटीओ विभागाकडून महामार्गावर 24 तास गस्त राहमार आहे. अनंत चतुर्थीच्या गणपतीचे विसर्जन होत असताना 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषध, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना नियम लागू नाही.

15 वर्षांपासून रखडलेला महामार्गावर गणेशोत्सवाच्या तोंडावर तात्पुरती खड्डेबाजी

मुंबई गोवा महामार्गाचं काम तब्बल 15 वर्षांपासून रखडलेलं असतानाच गणेशोत्सवाच्या तोंडावर केवळ खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ठेकेदारांकडून तात्पुरती कामं सुरू करण्यात आली आहेत. कुठे डांबर ओतलं जातंय तर कुठे सिमेंटचा आधार घेऊन खड्डयांना झाकलं जात आहे. मात्र या तात्पुरत्या उपायांनी गणेशभक्तांच्या प्रवासात खरंच दिलासा मिळणार का, की पुन्हा काही दिवसांतच रस्ते पूर्ववत खड्डेमय होतील? असा सवाल उपस्थित होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.