संजय राऊत यांनी नुकताच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याहून सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठी उलाढाल होत असते, यामुळे हे सामने घेतले जात आहे. पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचा हा सरकारचा नालायक पणा आहे. मात्र, ही घटना भारतीय क्रिकेटला काळिमा फासणारी असल्याचे राऊतांनी म्हटले. हेच नाही तर भारत पाक सामन्यात सर्वाधिक सट्टेबाजी ही गुजरातमध्येच होत असल्याचा दावाही त्यांनी केला. क्रिकेटमध्ये भारत पाकला शरण का जातंय? असाही यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना जोरदार विरोध हा होताना दिसतोय.
संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तान तुम्हाला शरण आलंय ना? मग क्रिकेटमध्ये तुम्ही शरण का जात आहात त्यांना. क्रिकेट हा खेळ नसून भारत आणि पाकिस्तान हे युद्ध म्हणून आहे. हे धर्म युद्ध होतं हे वारंवार म्हणत होते मोदी आणि त्यांची लोक. मग क्रिकेट कसे खेळत आहात? पाणी बंद केलं. त्यांच्यासोबत व्यापार बंद केला, त्यांचा व्हिसा बंद केला म्हणजे मेडिकल व्हिसा देखील सरकारने बंद केलाय.
संजय राऊत पुढे म्हणाले, पाकिस्तानमधून जे रूग्ण यायचे इथे उपचाराला त्यांचा व्हिसा देखील बंद केला आहे. इथंल्या पाकिस्तानी नागरिकांना आपण वेचून वेचून परत पाठवलय. मग क्रिकेट कशासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर खेळत आहात? कुठला पैसा आहे, कोणाचा व्यापार आहे क्रिकेटमध्ये? भारत आणि पाकिस्तान क्रिकेट हा सर्वात मोठा सट्टेबाजीचा विषय असतो. सर्वात जास्त सट्टेबाजी गुजरात आणि राजस्थानमधून होते. मुंबईनंतर.
मग त्यांच्यासाठीच ही खुली सूट दिलीये का? असेही राऊतांनी म्हटले. पुढे संजय राऊत म्हणाले की, जय शाह जे सध्या क्रिकेटचे सूत्रधार आहेत, त्यांचे वडील हे या देशाचे गृहमंत्री आहेत. म्हणजे राष्ट्रीय भावना फक्त आम्ही जपायच्या आणि यांच्या मुला बाळांनी क्रिकेट सामन्यांना मंजूरी द्यायच्या आणि भारत पाकिस्तान सामने खेळवायची, हा कोणता राष्ट्रवाद? याला मी देशद्रोह म्हणतो. ऑपरेशन सिंदुर संपले नाही, पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळत आहेत.