रोखले ठाकरे बंधूंना
esakal August 24, 2025 12:45 PM

विष्णू सोनवणे- saptrang@esakal.com

बेस्ट पतपेढीची ही निवडणूक या वेळी चर्चेत आली, ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निवडणुकीतील सहभागामुळे. हिंदी सक्तीच्या विरोधात हे दोन्ही बंधू एकत्र आले. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या दोघा भावांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होऊ लागली होती. त्यांच्या एकत्र येण्याचे सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले होते. या घटनेमुळे होऊ घातलेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. शिवसेना आणि मनसे पुरस्कृत उत्कर्ष पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात होते. बेस्ट उपक्रमात सर्वच मराठी भाषक कामगार आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण तापले असताना या वातावरणाचा फायदा होईल असे उत्कर्ष पॅनेलला वाटले, मात्र या पॅनेलचा दारुण पराभव झाला. या पॅनेलचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. भाजपा पुरस्कृत सहकार समृद्धी पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळाले. या पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या. ही निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती. मुंबई महापालिका निवडणुकीची ही निवडणूक रंगीत तालीम असून शशांक राव आणि लाड यांनी हा चमत्कार घडविला असल्याची चर्चाही जोरदार चर्चा आहे. त्यांच्या पॅनेलला भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा होती.

राजकीय पक्षांचा सहभाग

सहकार समृद्धी पॅनेल जिंकण्यासाठी लाड यांनी आपली पणाला लावली होती. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याची चर्चा आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्या उत्कर्ष पॅनेलने ही निवडणूक लढविली होती. पहिल्यांदाच राजकीय पक्षाचा सहभाग या निवडणुकीत दिसून आला. पालिका निवडणुकीच्या आधी ही निवडणूक झाल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली. या निवडणुकीला फार महत्त्व आले. बेस्टमध्ये ठाकरे बंधूंना रोखण्यात शशांक राव आणि लाड यांना यश आले. शिवसेना आणि मनसे पुरस्कृत उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नसल्याने भाजपकडून जोरदार टीका होत आली.

शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का

सलग नऊ वर्षे बेस्ट पतपेढीवर ठाकरे गटाची सत्ता होती. बेस्टमध्ये कामगार सेनेची युनियन असल्याने व त्यांच्या सभासदांच्या संख्याबळामुळे त्यांची पकड मजबूत मानली जात होती. मात्र यंदा उमेदवारी देताना आत्मविश्वासाच्या भरात तयारीशिवाय पॅनेल जाहीर केल्याने फटका बसला. शिवाय निवडणुकीच्या आधीच संचालक मंडळावरील सदस्यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटिस येणे अशा घटनांचा परिणाम त्यांच्या पराभवावर झाल्याची चर्चा आहे. परिणामी उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. शिवसेनेचे सुहास सामंत गाफील राहिले. मराठी बहुसंख्य मते ठाकरे बंधूंच्या नावाने मिळतील आणि आम्हीच जिंकून येऊ असे वाटल्यामुळे प्रचारावरही म्हणावा तसा भर दिला नाही.

तसेच सामंत यांच्यावर गैरव्यवहाराचे शशांक राव यांनी आरोप केले होते. त्याचाही परिणाम झाला. निवडणुकीत गाफील राहिल्याने ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्याची चर्चा आहे. त्यांच्या पॅनेलला दोन हजार मतांचा टप्पाही गाठता आला नाही. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे बेस्टमध्ये सुद्धा शिवसेनेची सत्ता होती. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर, बेस्ट पतपेढीची ही पहिलीच निवडणूक होती. विशेष म्हणजे या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली. महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले जात होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. पावसाच्या जोरदार तडाख्यातही निवडणुकीत कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून मिळाला.

शशांक राव यांचे वर्चस्व

शशांक राव यांनी बाजी मारली परंतु त्यांच्याविषयीही नाराजी होती. त्यांनी २०१९ मध्ये बेस्ट प्रशासनासोबत कंत्राटी बसेस घेण्याचा करार केला होता. तो करार बेस्ट कर्मचाऱ्यांना रुचला नव्हता. त्याचा फटका बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत राव यांनी बसेल असेच सर्वांना वाटत होते. मात्र राव यांच्या पाठीशी मंत्री आशिष शेलार हे ठाम राहिले. भाजपाने त्यांच्या पाठीशी ताकद लावली होती. त्याचा फायदा त्यांना झाला. शरद राव यांचे एके काळी बेस्टवर वर्चस्व होते. शशांक राव यांनाही कामगारांमध्ये सहानुभूती आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत झाला. त्यांनी १४ जागा जिंकून बहुमत मिळविले. नऊ वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत शशांक राव यांनी बाजी मारली आहे.

ठाकरे बंधूंना धक्का

दि बेस्ट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या २०२५-२०३० या कालावधीतल्या संचालक मंडळाकरता ही निवडणूक झाली. या निवडणुकीत २१ जागांसाठी १५ हजार कामगारांपैकी १२ हजार कामगारांनी मतदान केले. शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स गटाने १४ तर प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनेलने ७ जागा जिंकल्या. ठाकरे बंधूंच्या सहकार समृद्धी पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. ठाकरे बंधूंसाठी हा मोठा धक्का मानला जातो

असे झाले मतदान

बेस्ट पतपेढीच्या एकूण १५ हजार १२३ सभासदांपैकी तब्बल १२ हजार ६५६ सभासदांनी मतदान करून ८३ टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीचे मतदान गेल्या सोमवारी शहरातील ३५ मतदान केंद्रांवर पार पडले. मतमोजणी दुसऱ्याच दिवशी वडाळा आगारात होणार होती. मात्र मुसळधार पावसामुळे अधिकारी उशिरा पोहोचले आणि दुपारी दोननंतरच मतमोजणीला सुरुवात झाली. त्यामुळे मतमोजणीला विलंब झाला आणि निकाल पहाटेच जाहीर करण्यात आला. या निकालामुळे बेस्ट पतपेढीच्या राजकारणात मोठा बदल झाला असून ठाकरे गटाची नऊ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. आता पतपेढीवर शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनचा मजबूत ताबा निर्माण झाला आहे.

राव आणि लाड यांच्यात चुरस

बेस्ट पतपेढीची ही निवडणूक ठाकरे बंधू व आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. सुरुवातीपासूनच दोन्ही पॅनेलकडून सोशल मीडियावर विजयाचे दावे केले जात होते. मात्र खरी लढत लाड यांचे पॅनेल आणि शशांक राव यांचे पॅनेल यांच्यात झाली. अखेरीस राव यांनी निवडणुकीत कोणताही गाजावाजा न करता भक्कम विजय मिळवला.

आरोपांनी निवडणूक गाजली

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या निवडणुकीत भाजपाने पैशाचे वाटप केल्याचे आरोप करून त्यांनी पैशाची पाकिटे प्रसार माध्यमांना दाखविली. त्यामुळे ही निवडणूक आरोपांनी गाजली. आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेनेच्या वर्चस्वाला शशांक राव यांनी मोठा धक्का दिला आहे. कामगारांनी राजकीय वर्चस्व नाकारल्याचे या निवडणुकीत दिसून आले. आता होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. त्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

मत विभागणी

बेस्ट मधील कामगार नेते सुनील गणाचार्य आणि विठ्ठलराव गायकवाड यांनी या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मत विभागणीचा फटका समर्थ पॅनल आणि समृद्धी पॅनल या दोन्ही पॅनलला बसल्याची चर्चा बेस्ट वर्तुळात आहे

सौंदर्याची उधळण

‘बेस्ट’ उपक्रमाच्या परिवहन सेवेची ख्याती अवघ्या आशिया खंडात आहे. हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. उपक्रमावरील गडद होत चाललेले हे संकट दूर कसे करायचे, या विवंचनेत उपक्रम असताना बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या ६५० कोटी रुपये उलाढाल असलेल्या दि बेस्ट को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव झाला. बेस्टमधील एका छोट्या पतपेढीच्या निवडणुकीला राजकीय रंग आल्याचे अधोरेखित झाले, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.