गणेशतत्त्वाला जागृत करा!
esakal August 24, 2025 12:45 PM

गुरुदेव श्री श्री रविशंकर-saptrang@esakal.com

साकार रूपाशिवाय निराकाराचा बोध प्रत्येकाला होत नाही. आपले प्राचीन ऋषी-मुनी हे जाणून होते. म्हणूनच सर्व स्तरांतील लोकांच्या हितासाठी आणि समजुतीसाठी त्यांनी गणपतीचे साकार रूप निर्माण केले. जे निराकाराचा अनुभव घेऊ शकत नाहीत, ते साकाराचा सतत अनुभव घेत-घेत अखेरीस निराकार ब्रह्मापर्यंत पोहोचतात. गणेश चतुर्थीनिमित्त आपल्यातील गणेशतत्त्वाला जागृत करणे, हाच या उत्सवाचा सार...

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांना आपल्या सान्निध्याचा अनुभव देतात, अशी मान्यता आहे. तुम्हाला माहीत आहे का, की ज्या मूर्तीची आपण पूजाअर्चा करतो ती प्रतिमा प्रत्यक्षात आपल्या अंतर्मनात दडलेल्या दैवीत्वाच्या बोधाचे माध्यम आहे? गणेश चतुर्थी हा केवळ भगवान गणपतीचा जन्मोत्सव नाही, तर आपल्या अंतःकरणातील चेतना जागृत करण्याचा एक आध्यात्मिक प्रवास आहे.

आदि शंकराचार्यांनी गणपतीवर अत्यंत सुंदर रचना केली आहे. गणपतीची पूजा गजमुखधारी स्वरूपात केली जाते, तरी त्यांचे हे रूप त्यांच्या परब्रह्म स्वरूप प्रकट करण्यासाठी आहे. त्यांना ‘अजम् निर्विकल्पं निराकारमेकम्’ असे म्हटले आहे. याचा अर्थ असा, की गणपती कधी जन्म घेत नाहीत. ते अजन्मा (अजम्), विकल्परहित (निर्विकल्पम्) आणि आकाररहित (निराकारम्) आहेत. ते त्या चेतनेचे प्रतीक आहेत जी सर्वव्यापी आहे, या विश्वाचे मूळ कारण आहे, ज्यापासून सर्व काही प्रकट होते आणि ज्यामध्ये संपूर्ण विश्व लय पावते. गणपती कुठे बाहेर नाहीत, तर आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहेत. पण हे अत्यंत सूक्ष्म तत्त्वज्ञान आहे.

साकार आणि निराकार

साकार रूपाशिवाय निराकाराचा बोध प्रत्येकाला होत नाही. आपले प्राचीन ऋषी-मुनी हे जाणून होते. म्हणूनच सर्व स्तरांतील लोकांच्या हितासाठी आणि समजुतीसाठी त्यांनी गणपतीचे साकार रूप निर्माण केले. जे निराकाराचा अनुभव घेऊ शकत नाहीत, ते साकाराचा सतत अनुभव घेत-घेत अखेरीस निराकार ब्रह्मापर्यंत पोहोचतात. प्रत्यक्षात गणपती निराकार आहेत, तरीही त्यांचे असे एक रूप आहे ज्याची पूजा आदि शंकराचार्यांनी केली आणि ते रूप स्वतः गणपतीच्या निराकार स्वरूपाचा संदेश देते.

या बायकांचे करायचे काय?

त्यामुळे साकार हे केवळ प्रारंभीचे साधन आहे, ज्यातून हळूहळू निराकार चेतना जागृत होऊ लागते. गणेश चतुर्थीचा उत्सव म्हणजे गणपतीच्या साकार रूपाची पुनःपुन्हा पूजा करून निराकार परमात्म्यापर्यंत पोहोचण्याच्या अनोख्या साधनेचे प्रतीक आहे. इतकेच नाही, तर गणेश स्तोत्र, गणपतीच्या स्तुतीत केलेल्या प्रार्थना देखील हाच संदेश देतात. आपल्या चेतनेत वास करणाऱ्या गणपतींना आपण प्रार्थना करतो, की ते बाहेर प्रकट व्हावेत आणि काही काळासाठी मूर्तीत विराजमान व्हावेत, जेणेकरून आपण त्यांच्या साकार दर्शनाचा लाभ घेऊ शकू. आणि पूजा झाल्यावर आपण पुन्हा त्यांना विनवतो की ज्या ठिकाणाहून ते आले, म्हणजेच आपल्या चेतनेत, ते परत जावेत. आपल्याला ईश्वराकडून जे काही प्राप्त झाले आहे, ते सर्व आपण प्रेमपूर्वक पूजेत अर्पण करतो आणि स्वतःला धन्य मानतो.

ईश्वर आपल्या आतच...

काही दिवसांच्या पूजनानंतर मूर्ती विसर्जनाची प्रथा हीच गोष्ट अधोरेखित करते, की ईश्वर मूर्तीत नसून आपल्या आत आहे. म्हणूनच सर्वव्यापी स्वरूपाचा अनुभव घेणे आणि त्यातून आनंद मिळवणे, हाच गणेश चतुर्थी उत्सवाचा सार आहे. एक अर्थाने, अशा प्रकारचे सामूहिक उत्सव आणि पूजाअर्चा उत्साह आणि भक्ती वाढवण्यास कारणीभूत ठरतात. गणपती हे आपल्या अंतरंगातील सर्व सद्गुणांचे अधिपती आहेत. म्हणून आपण त्यांची पूजा करतो व ती केल्यावर आपल्यातील सर्व सद्गुण फुलू लागतात. ते ज्ञान आणि बुद्धीचेही अधिपती आहेत. ज्ञान तेव्हाच प्रकट होते जेव्हा आपण स्वतःच्या विषयी जागरूक होतो. जडत्व असताना ना ज्ञान असते, ना बुद्धी, ना जीवनात उत्साह किंवा प्रगती. चेतना जागृत होणे आवश्यक आहे आणि चेतना जागृत करण्यासाठी प्रत्येक पूजेनंतर प्रथम गणपतीची पूजा केली जाते. म्हणूनच, मूर्ती प्रतिष्ठापित करा, अनंत प्रेमाने पूजा करा, ध्यानधारणा करा आणि आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यातून भगवान गणेशाचा अनुभव घ्या. हाच गणेश चतुर्थी उत्सवाचा प्रतीकात्मक सार आहे ः आपल्या आत दडलेल्या गणेशतत्त्वाला जागृत करणे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.