मंगळवेढा - मोबाईलच्या अतिरेकामुळे विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंतची वाचन संस्कृती कमी होत चालल्यामुळे अनेक नात्यांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे दुरावा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाने परभणी ते कोल्हापूर 555 किलोमीटर सायकल यात्रा करून वाचन संस्कृती रूजवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवला.
मोबाईलमुळे कोरोना काळामध्ये शिक्षणामध्ये मोठा खंड निर्माण झाला परंतु सरकारने या परिस्थितीत मोबाईल वरून ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शोधला परंतु या ऑनलाइन शिक्षणाचे फायद्यापेक्षा तोटेच अधिक दिसून आले.
ऑनलाइन शिक्षणासाठी घेतलेले अनेक मोबाईल कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर देखील मोबाईल इतर गोष्टीच्या आहारी अधिक प्रमाणात गेल्याचे सध्याचे वास्तव चित्र आहे मोबाईलच्या आहारी गेलेली तरुणाई फेसबुक,इंस्टाग्राम, ट्विटर, आणि रील्सच्या मोहाजाळ्यात अडकून सध्या वाचनापासून दुरावली आहे.
मोबाईलवर देखील ऑनलाइन वाचणे साहित्य उपलब्ध असले तरी ते देखील वाचण्याकडे देखील वाचण्याचा कल कमी झाला. अशा परिस्थितीत परभणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने ही वाचन संस्कृती कायम टिकवण्याच्या दृष्टीने सहकुटुंब वाचन करूया, वाचण्यासाठी निमित्त शोधू या, अक्षर आनंद पुस्तक वाचन स्पर्धा राबवू या, अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र सुरू करू या, मी वाचलेले पुस्तक या विषयावर बोलू या, अशाप्रकारे पाच कृती कार्यक्रम राबवत वाचन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
परभणी पासून सुरु केलेल्या सायकल यात्रा कोल्हापूरला जाईपर्यंत रात्रीच्या मुक्काम हा जिल्हा परिषद शाळेत ग्रंथालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी मुक्काम करून त्याच ठिकाणी तिथल्या लोकांना एकत्र बोलून वाचनाविषयीचे महत्व सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एका बाजूला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा ओढा कमी होत चालला असताना या शिक्षकांनी मात्र वाचन संस्कृती जोडण्यासाठी अनोखा फंडा वापरलेला आणि हा फंडा भविष्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक ठरणार असला ती प्रत्यक्षात किती प्रमाणात कृतीत उतरणार यावर भविष्य अवलंबून असले तरी जागरूक नागरिकांनी जनजागृती करण्यासाठी यातून बोध घेणे आवश्यक आहे.
आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावर मी सायकल यात्रा काढल्या जवळपास सहा हजार किलोमीटर चा प्रवास सायकलवर पूर्ण केला. बालकांवर वाचनाचे संस्कार व्हावेत. वाचनाचे सामाजिकीकरण व्हावे. वाचन संस्कृती वाढावी. त्यातून प्रगल्भ विचाराचा नागरिक घडावा. या उद्देशाने 'नाचू पुस्तकांच्या अंगणी, गाव संस्काराची गाणी' हे घोषवाक्य घेवून मी परभणी ते कोल्हापूर ही सहा दिवसाची सायकल यात्रा काढली आहे यातून वाचनाचे महत्त्व सांगून त्यासाठी प्रबोधन करीत आहे. मंगळवेढ्यातील मंगळवेढा नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 5 मध्ये देखील विद्यार्थ्यांना वाचन करा,पुस्तकाशी मैत्री करा,यावर मार्गदर्शन केले.
- विनोद शेंडगे, प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा सोमठाणा, ता. मानवत