राधा ठाकुर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडिया ए ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली आहे. ऑस्ट्रेलिया ए वूमन्स टीमने भारताच्या महिला ब्रिगेडवर 4 दिवसांच्या अनऑफिशियल टेस्ट मॅचमधील अंतिम दिवशी 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. याआधी ऑस्ट्रेलियाने भारताचा टी 20 मालिकेत 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला होता. तर भारताने एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली होती. मात्र एकमेव कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही.
भारताने पहिल्या डावात सर्वबाद 299 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात ऑलआऊट 305 पर्यंत मजल मारली आणि 6 धावांनी नाममात्र आघाडी घेतली. भारताला दुसऱ्या डावात 286 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 281 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 85.3 ओव्हरमध्ये 284 धावा केल्या आणि हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात कॅप्टन ताहिला विल्सन हीने 46 धावांची निर्णायक खेळी केली. तर रेचल ट्रेनान हीने अर्धशतक ठोकलं. रेचलने 64 धावा केल्या. तसेच मॅडी डार्क हीने 68 रन्स केल्या. तर एनिका लीरॉयड हीने सर्वाधिक 72 धावांचं योगदान दिलं. भारताकडून पहिल्या डावात एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. तर दुसऱ्या डावात 8 जणांनी बॉलिंग केली आणि विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. भारतासाठी साईमा ठाकुर हीने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 5 विकेट्स घेतल्या.
भारतासाठी राघवी बिष्ट हीने दोन्ही डावात चमकदार कामगिरी केली. एकट्या राघवीने कांगारुंना झुंजवलं. राघवीने पहिल्या डावात 16 चौकारांच्या मदतीने 93 धावा केल्या. शफाली वर्मा हीने 35 तर कॅप्टन राधा यादवने 33 धावा केल्या. तसेच मिन्नू मणीने 28 धावा जोडल्या. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 299 पर्यंत पोहचता आलं.
तर दुसऱ्या डावातही भारताला 300 पार मजल मारता आली नाही. भारताने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 305 च्या प्रत्युत्तरात 286 धावा केल्या. राघवीने दुसऱ्या डावात 86 धावा केल्या. तर शफालीने 52 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात एमी एडगर हीने 5 विकेट्स घेतल्या. तर जॉर्जिया प्रेस्टविजने तिघांना बाद केलं. त्यानंतर कांगारुंनी 4 विकेट्स गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं.