दहा मिनिटांच्या प्रवासासाठी दोन तास
esakal August 25, 2025 10:45 AM

१० मिनिटांच्या प्रवासासाठी दोन तास
वाहतूक कोंडीने गणेशभक्तांसाह चालक त्रस्त

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेतली, परंतु या उत्साहाला रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीचा अट्टाहास आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे विरजण पडले आहे. कल्याण-शहाड-उल्हासनगर परिसर वाहतूक कोंडीत अक्षरशः गुदमरत असून, फक्त १० मिनिटांचा प्रवासही दोन तासांपेक्षा अधिक वेळ घेत आहे. नागरिकांचा संयम सुटत असून, संताप व्यक्त केला जात आहे.

परिसरातील वाहतूक यंत्रणा गुरुवारपासून पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसून आले. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे तयार झाले असून, त्यात पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग ओळखणेही कठीण झाले आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे प्रेम ऑटो चौक, शहाड ब्रिज, मुरबाड रोड, संतोषी माता रोड, वालधुनी या प्रमुख मार्गांवर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. फक्त प्रेम ऑटो चौक ते शहाड हे साधारणतः १० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन तास रांगेत थांबावे लागले. लहान मुले, वृद्ध, महिला आणि ऑफिसमधून घरी परतणारे कर्मचारी यांना याचा मोठा फटका बसला.

प्रचंड वाहतुकीचा ताण सहन करणारा शहाड ब्रिज आधीच दयनीय स्थितीत आहे. पुलावर दररोज वाढत जाणारी वाहनांची गर्दी आणि दुरुस्तीअभावी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. पुलावरील खड्डे व झिजलेले भाग यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वी वाहतूक कोंडीमुक्त कल्याण-शहाड-उल्हासनगरचा श्वास मोकळा होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

निष्क्रिय वाहतूक व्यवस्था
वाहतुकीचा ताण कमी करण्याऐवजी अनेक ट्रॅफिक वॉर्डन मोबाईलमध्ये रमलेले असल्याचे नागरिकांचं म्हणणे आहे. अनुभवी मनुष्यबळाची कमतरता, नव्या वॉर्डनना अनुभवाचा अभाव आणि वाहतुकीच्या व्यवस्थापनातील दुर्लक्ष यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे.

ध्वनिप्रदूषणात वाढ
वाहनांच्या धुरामुळे वातावरण प्रदूषित होत असून, हॉर्नच्या आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर ताण वाढला आहे. महानगरपालिकेने पर्यावरणपूरक उपक्रम राबवले असले तरी वाहतुकीची ही गंभीर समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.