-rat२३p१२.jpg
२५N८६५४१
साखरपा ः प्रेरणा शाहिरी पुरस्कार स्वीकारताना लोककलावंत सचिन उजगावकर.
-----
शाहीर उजगावकरांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. २४ : लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या कडवई उजगावकरवाडीतील सचिन उजगावकर यांना प्रेरणा शाहिरी पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. गेली तब्बल २६ वर्षे ते शाहिरीच्या माध्यमातून लोककला जोपासत आहेत.
उजगावकर हे लोककलावंत डबलबारी प्रकारातील शक्तीतुरा गायकीचे कलावंत आहेत. गेली अडीच दशके ते शक्तीतुरा या लोककला प्रकाराचा प्रचार करत आहेत. त्यांनी या कलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. परशुराम येथील शाहीर अभय सहस्रबुद्धे यांच्याकडून त्यांनी कवी रामचंद्र पंडित यांच्या घराण्याचे शिक्षण घेतले. शक्तीतुरा प्रकारात ते तुरा या लोककलेची परंपरा चालवतात. डबलबारी या नाच आणि गायन लोककला प्रकारात अश्लीलता येऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. उजगावकर यांच्या लोककलेतील या योगदानाबद्दल कलगीतुरा समाजोन्नती मंडळातर्फे प्रेरणा शाहिरी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. चिपळूण येथे हा सोहळा झाला.