घाटकोपरमध्ये मराठा समाजाची जनजागृती बाइक रॅली
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार (ता. २४) जनजागृती बाइक रॅलीचे आयोजन केले होते. भटवाडी येथील सिद्धी गणेश मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृतनगर सर्कलमार्गे ही रॅली पार पडली. या रॅलीत घाटकोपर परिसरातील हजारो मराठा बांधव, युवक-युवती आणि महिला सहभागी झाल्या होत्या. एक मराठा, लाख मराठा, जय शिवराय-जय जिजाऊ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या रॅलीचे आयोजन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी केले होते. या रॅलीचे महत्त्व केवळ एकदिवसीय आंदोलनापुरते मर्यादित न राहता, मराठा समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि पुढच्या पिढीमध्ये सामाजिक भान जागवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे आयोजकांनी सांगितले.