Asia Cup 2025 : टी 20 आशिया कपमध्ये शुबमनला संधी देण्याचा निर्णय किती योग्य? पाहा आकडेवारी
GH News August 27, 2025 01:13 AM

आगामी आशिया कप 2025 स्पर्धेत यंदा एकूण 8 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ खेळताना दिसणार आहेत. या आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. आतापर्यंत 8 पैकी 6 संघाची घोषणा करण्यात आली आहे. या 6 संघात, पाकिस्तान, टीम इंडिया, ओमान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँगने संघ जाहीर केला आहे. तर श्रीलंका आणि यूएईने संघाची घोषणा केलेली नाही. या 8 संघांची 4-4 नुसार 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई ए ग्रुपमध्ये आहेत. तर अफगाणिस्तान, श्रीलंका, हाँगकाँग आणि बांगलादेश बी ग्रुपमध्ये आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 8 संघ खेळणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना आधीपेक्षा अधिक सामने होणार आहेत.

पाकिस्तानने या स्पर्धेसाठी सर्वात आधी संघ जाहीर केला. पाकिस्ताननंतर 19 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादव याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर कसोटी कर्णधार शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह या दोघांचं टी 20i संघात कमबॅक झालं. निवड समितीच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अक्षर पटेल याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद हे शुबमन गिल याला देण्यात आलं. मात्र शुबमन गिल याला संधी देण्याचा निर्णय किती योग्य आहे? शुबमनने आधी आशिया कप स्पर्धेत किती धावा केल्यात? हे सविस्तर जाणून घेऊयात.

शुबमनची 2023 आशिया कपमधील कामगिरी

शुबमन गिल याची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची एकूण दुसरी वेळ असणार आहे. शुबमनने गेल्या आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2023) खेळला होता. शुबमन तेव्हा त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. शुबमनने वनडे फॉर्मेटने झालेल्या त्या स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये 76 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या होत्या. शुबमनने 302 धावा केल्या होत्या. शुबमनने या दरम्यान 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली होती.

यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धा होत आहे. शुबमनची टी 20 आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे शुबमनच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. तसेच शुबमन उपकर्णधारही आहे. त्यामुळे शुबमनवर अधिक जबाबदारी असणार आहे.

शुबमनची टी 20i कारकीर्द

दरम्यान शुबमन वनडे आणि कसोटीच्या तुलनेत टी 20i फॉर्मेटमध्ये कमी सामने खेळला आहे. शुबमनने 21 टी 20 सामन्यांमध्ये 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 3 अर्धशतक आणि 1 शतकही केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.