BJP President Election : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पुढील अध्यक्षाचे नाव अजून निश्चित झालेले नाही. पक्षाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा किंवा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच अध्यक्षाचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चेला आणखी वेग आला आहे.
अध्यक्ष निवडीवर अटकळइंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भाजप हायकमांडने संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. मात्र, या विषयावर औपचारिक निर्णय ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीनंतर घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतरच नव्या अध्यक्षाचे नाव अधिकृतपणे घोषित होऊ शकते. तसेच, अध्यक्ष निवडीपूर्वी उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांच्या प्रमुखांची निवड होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीपूर्वी किंवा नंतर निर्णय?जर बिहार निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अध्यक्ष निश्चित झाले नाहीत, तर हा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल, असेही सांगितले जात आहे. सध्या तरी भाजपकडून अध्यक्षांच्या निवडीसंबंधी कोणतीही औपचारिक माहिती दिलेली नाही.
दिल्लीत महत्त्वाची बैठकरविवारी शिवराज सिंह चौहान आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात ४५ मिनिटांची महत्त्वाची बैठक झाल्याचे वृत्त आहे. ही बैठक बंद खोलीत झाली असून दोन वर्षांनंतर चौहान आणि भागवत यांच्यात झालेली ही पहिली मोठी भेट मानली जात आहे. शिवराज सिंह चौहान यांचे नाव अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
इतर संभाव्य उमेदवारांची नावेशिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, आंध्र प्रदेश भाजप प्रमुख डी. पुरंदेश्वरी, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनती श्रीनिवासन, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, तसेच भाजप नेते विनोद तावडे यांचाही समावेश आहे. तथापि, या कोणत्याही नावांबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही.