Bihar Minister Attack : बिहार सरकारमधील मंत्री श्रवण कुमार यांच्यावर नालंदा जिल्ह्यात ग्रामस्थांनी हल्ला केला. गावातील नागरिकांना भेटण्यासाठी ते गेले असता हा प्रकार घडला. ग्रामस्थांनी मंत्र्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, एवढेच नव्हे तर काठ्यांनी हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळात त्यांचे अंगरक्षक जखमी झाले असून, मंत्री सुरक्षित बाहेर पडले.
माहितीनुसार, नालंदामधील (Nalanda Villagers Protest) एका गावात झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंत्री, स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांसह पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात पोहोचले. त्यावेळी भरपाईच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला.
मंत्री श्रवण कुमार यांनी भरपाई प्रक्रियेनुसार दिली जाईल, असे सांगताच ग्रामस्थ संतापले आणि परिस्थिती चिघळली. ग्रामस्थांनी मंत्र्यांचा पाठलाग केला, त्यात त्यांनी अंगरक्षकांवरही हल्ला केला. काही अंगरक्षक जखमी झाले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हल्ल्याच्या गोंधळात मंत्री सुमारे एक किलोमीटर अंतर पायी चालत त्यांच्या गाडीत पोहोचले आणि तिथून सुरक्षितपणे बाहेर निघून गेले. सध्या पोलिस व्हिडिओच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवत आहेत.